श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याच्या अंतर्गत कामाची वारकरी संप्रदाय पाईक संघ शिष्टमंडळाकडून पहाणी
पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याच्या अंतर्गत सध्या जे काम चालू आहे, त्या कामाची वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या शिष्टमंडळाने पहाणी केली. या पहाणीत अनेक गंभीर त्रुटी आम्हाला आढळून आल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यासाठी श्री विठ्ठलाचे दर्शन भाविकांना बंद केले, त्या मुख्य गाभार्याचे काम अद्याप १० टक्केही पूर्ण नाही. जे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, असे सांगितले जाते, त्या विभागाचा एकही सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही, अशी माहिती वारकरी संप्रदाय पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी दिली.
या प्रसंगी ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, रघुनाथ महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, श्याम महाराज उखळीकर, भानुदास महाराज चातुर्मासे, ज्ञानेश्वर महाराज तारे यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे सदस्य श्री. गणेश तथा पुरुषोत्तम सुरेश लंके उपस्थित होते.
वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या शिष्टमंडळाला आढळून आलेल्या अन्य गंभीर गोष्टी
१. मंदिरात ज्या ठिकाणी कामे चालू आहेत, त्या ठिकाणी तज्ञ कामगारांची संख्या अल्प असून एकूणच कामगारांची संख्याही अल्प आहे.
२. गाभार्यातील ग्रॅनाईट काढून मूळ स्वरूप देण्यासाठी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या ४५ दिवसांत केवळ ग्रॅनाईटच काढलेले आहे. गाभार्यातील कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही.
३. मंदिरातील सभामंडप, गजेंद्र मंडप, बाजीराव पडसाळी या सर्वच ठिकाणी एका वेळी दगडी फरशी पालटण्याचे काम चालू आहे. त्यामुळे कोणतेही काम पूर्णत्वाकडे नाही.
४. सभामंडपातील शहाबादी फरशीच्या खाली असणारी जुनी दगडी फरशी बहुतांश सुस्थितीत असतांना ती काढून नवीन आणि तुलनेने कमकुवत नवीन दगडी फरशी बसवण्याचा अट्टाहास का करण्यात येत आहे, हे लक्षात आले नाही. यात काही खराब जुन्या दगडांचे संवर्धन किंवा तेवढेच दगड पालटणे शक्य होते.
५. चालू कामावर सुपरव्हिजन इंजिनिअर (निरीक्षक अभियंते) किमान अशा कामातील अतिशय अनुभवी असायला हवे होते; मात्र तुलनेने नवीन एक-दोन अभियंते निरीक्षणासाठी उपस्थित होते.
६. या संवर्धनात वर्ष १९८५ नंतर स्थापन झालेल्या मंदिर समितीनेच अनेक ठिकाणी अनावश्यक बांधकामे केल्याने जुन्या कामाचे विद्रुपीकरण आणि वातानुकूलित यंत्रणांसारख्या यंत्रणा बसवण्याच्या अट्टाहासाने ठिकठिकाणी जुन्या दगडांवर, विटा-सिमेंटचे काम, लोखंडी खिळे, स्क्रू यांमुळे हानी झालेली आहे. अनेक दगडांना गेलेले तडे या कामामुळेच गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे काम काही वर्षांपूर्वीचेच असल्याचे तात्काळ लक्षात येते.
मंदिर समितीने सभामंडपात केलेली कार्यालये हटवण्यात आलेली नाहीत !जुने रूप समोर आणण्यासाठी चांदीकाम काढण्यात आले; मात्र मंदिर समितीने सभामंडपात लाखो रुपये व्यय करून जी कार्यालये थाटण्यात आली आहेत, त्यांना कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही. वास्तविक मंदिर विकास आराखडयाच्या संरचनेत ही कार्यालये हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. |
संपादकीय भूमिका
|