महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे ! – नवनीत राणा, खासदार

नवनीत राणा, खासदार

संभाजीनगर – गेली ५ वर्षे संभाजीनगर येथे ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार असून त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही. गत वेळेस ओवैसींनी ‘१५ मिनिटे पोलीस हटवा’, अशी भाषा केली होती, या वेळेसही त्यांची तीच भाषा आहे. ‘एम्.आय.एम्.’ची विचारसरणी औरंगजेबाच्या विचारसरणीसारखी आहे. याचसमवेत काँग्रेससाठी पाकिस्तानमधून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस निवडून यावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले. त्या महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांना गाडण्याची भाषा करतात. भारतीय संस्कृतीत अग्नी देतात, गाडत नाहीत हे त्यांना माहिती नाही. मला मातोश्रीबाहेर हनुमानचालिसा पठण करायचे होते; मात्र मला ते करू दिले नाही आणि १४ दिवस कारागृहात टाकण्यात आले. सध्या उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याऐवजी महायुतीलाच मतदान करावे.’’