कोल्हापूर – राजारामपुरी येथे आलेले दोन भिक्षेकरी शाळकरी मुलांच्या अपहरणासाठी आले आहेत, असा समज परिसरातील जमावाचा झाला. यामुळे जमावाने त्यांना मारहाण करून शाहूपुरी पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.
राजारामपुरीतील शाळकरी मुलगा ‘लॉ कॉलेज’जवळ मित्राच्या दुकानाजवळ थांबला होता. याच वेळी दोन अनोळखी तरुण तेथून जात होते. या तरुणांच्या हालचाली एका रिक्शाचालकास संशयास्पद वाटल्या आणि ‘हे दोघे त्या विद्यार्थ्यास पळवून नेण्यासाठी आले असावेत’, असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने आरडा-ओरड केली. यानंतर जमाव एकत्र आल्यावर नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संशय बळावल्याने नागरिकांनी त्यांना मारहाण केली.
ही गोष्ट पोलीस प्रशासनास कळताच पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर घटनास्थळी पोचले. त्यांनी अधिक चौकशी करून या तरुणांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे दोघे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून ते भिक्षा मागण्यासाठी विविध शहरांत जातात.