दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !; दिवेघाटात एस्.टी. बसचा अपघात !…

१३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी होणार आहे. राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहिल्यादेवीनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघात हे मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये २९ सहस्र २८४ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे.


दिवेघाटात एस्.टी. बसचा अपघात !

पुणे – सासवडहून हडपसरच्या दिशेने येणार्‍या एस्.टी. बसचा दिवेघाटात एका वळणावर अपघात झाला. डोंगराच्या बाजूला असणार्‍या रस्त्यालगत चारीमध्ये (चारी म्हणजे विशिष्ट कामांसाठी रस्त्याच्या कडेने खोदण्यात आलेला खड्डा) एस्.टी. गेल्याने अपघात झाला. या अपघातात जीवितहानी अथवा कुणालाही दुखापत झाली नाही. बसचालक अपघातानंतर पळून गेला. प्रवाशांनी एकमेकांना साहाय्य करत खिडकीतून बाहेर येण्यात यश मिळवले.

भोर (पुणे) शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा !

पुणे – भोर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या भाटघर धरणातील पाणीसाठा न्यून झाल्यामुळे १३ मेपासून भोर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. भोर नगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाला भाटघर धरणातील पाण्यासाठी २५ लाख रुपये पाणीपट्टी प्रतिवर्षी दिली जाते; मात्र प्रत्येक वर्षी  मेमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिक अप्रसन्न आहेत.


मालकाला जामीन !

भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेचे प्रकरण

मुंबई – २९ एप्रिल २०२३ या दिवशी भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या इमारतींच्या मालकाला उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना दुसर्‍याच दिवशी अटक केली होती. इमारत कोसळण्यात आणि पीडितांच्या मृत्यूस मालक कारणीभूत होता कि नाही, हे खटल्याच्या वेळी स्पष्ट होईल.


रसायनमिश्रित पाणी इंद्रायणीत सोडल्याचे प्रकरण धर्मांधावर गुन्हा नोंद !

पिंपरी (जिल्हा पुणे) – आस्थापनाचे रसायनमिश्रित पाणी नाल्यावाटे इंद्रायणी नदीपात्रात सोडून प्रदूषण केल्याप्रकरणी अब्दुलमलिक खान यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार नोंद करण्यात आला आहे. ही घटना चिखलीतील कुदळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी अमोल गोरखे यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

संपादकीय भूमिका : प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचा सहभाग असणे हे देशासाठी घातक !