महत्त्व : तीलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे. तीलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे. अक्षय तृतीयेला उच्च लोकांतून येणारी सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी पूर्वज या दिवशी पृथ्वीच्या जवळ येतात. मानवावर पूर्वजांचे ऋणही पुष्कळ आहे. हे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तीलतर्पण करायचे असते.
तीलतर्पणामुळे देव आणि पितर ऋण काही प्रमाणात अल्प होते !
अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला देवता आणि पूर्वज यांना केलेल्या तीलतर्पणामुळे देव आणि पितर ऋणही काही प्रमाणात अल्प होण्यास साहाय्य होते. प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरित्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज व्यक्तीवर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात.
– ईश्वर (सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के))
अक्षय्य तृतीयेला तीलतर्पण कुणाला, कसे करायचे ?
देवता
पद्धत : प्रथम देवतांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. तीळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे आलेली आहेत’, असा भाव ठेवून तीळ हातात घ्यावेत. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.
परिणाम : प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर) तीळ अर्पण केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता जास्त प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्याचा भाव जागृत होतो. भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता तीलतर्पण करणार्याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते. यावरून ‘देव भावाचा भुकेला असतो’, हे लक्षात येते. देवाला भाव आणि अहं अर्पण केल्यानंतर तो भरभरून देतो.
पूर्वज
पद्धत : (पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि त्यांच्या चरणांवर देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि जल अर्पण करीत आहोत, असा भाव ठेवावा) : दुसर्या ताटलीमध्ये आपल्याला पूर्वजांना आवाहन करायचे असते. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.
परिणाम : (तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळणे आणि मानवाला होणारा पूर्वजांचा त्रास ५ ते १० टक्क्यांनी अल्प होणे) : तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम नष्ट करण्याची क्षमता जास्त आहे. साधकाच्या भावानुसार तीलतर्पण करतांना सूक्ष्मातून ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-देहावरील काळे (त्रासदायक शक्तीचे) आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते. प्रथम देवतांना तीळ अर्पण केल्यामुळे साधकाला सात्त्विकता मिळालेली असते आणि त्याचा भाव ४० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्याच्या भोवती ईश्वर सूक्ष्मातून संरक्षककवच निर्माण करतो. यामुळे पूर्वजांना तीलतर्पण करतांना साधकाला त्रास होत नाही. तीलतर्पणाच्या कृतीमुळे मानवाला होणारा पूर्वजांचा त्रास ५ ते १० टक्के इतका अल्प होतो.
– ईश्वर (सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्या माध्यमातून)
|