Chang’e 6 mission: चीन ‘चांग ई ६’ मोहीम चंद्रावर पाठवणार !

चीन चंद्रावर प्रादेशिक दावा करू इच्छित आहे ! – अमेरिका

बीजिंग (चीन) – कावेबाज चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या दूरच्या भागात जाण्यासाठी नवीन ‘चांग ई ६’ मोहीम हाती घेतली आहे. येथून माती आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे चीनने जरी म्हटले असले, तरी त्याद्वारे तो काहीतरी वेगळाच कट रचत असल्याचे तज्ञांचे मत आहे. चीनची अंतराळात वाढती पावले अमेरिकेची चिंता वाढवत आहे.

गेल्या सप्ताहात ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले होते की, अमेरिका आणि चीन खरोखरच चंद्रावर परत जाण्याच्या शर्यतीत आहेत. चीन चंद्रावर प्रादेशिक दावा करू इच्छित आहे, अशी भीती नेल्सन यांनी व्यक्त केली. चीनच्या तथाकथित नागरी अंतराळ कार्यक्रमांपैकी बहुतेक कार्यक्रम सैन्यासंबंधी आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘अवकाशातील उपग्रह नष्ट करू शकतील’, अशा शस्त्रांची निर्मिती हाही चिंतेचा विषय आहे, असे नेल्सन यांनी म्हटले.

अनुमाने ५० वर्षांपूर्वी अवकाशात अमेरिका आणि रशिया यांच्यात शर्यत चालू झाली होती; पण आज चीन अन् अमेरिका अवकाशात एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याखेरीज नुकतेच चीनने ‘तियांगाँग स्पेस स्टेशन’साठी नवी मोहीम हाती घेतली आहे.