नामस्मरण करणे महत्त्वाचे !

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

‘जिभेने ‘राम राम’ चालू करा, मनाची पर्वा करू नका. ‘मन लागत नाही’, असा विचारही करू नका. जसा अग्नीचा स्पर्श मनाला झाला नाही, तरी शरीर जळतेच, तसेच भगवंताचे नाम कसेही घेतले, तरी ते अंतर्मन निर्मल करणारच. सध्या मन लागत नसेल, काळजी करू नका, नाम घेत रहा; कारण मुळात आपली इच्छा तर मन लावण्याची असतेच ना ! इच्छा आहे म्हणूनच तर तुम्ही नाम घेत आहात. भगवंताचा वास हृदयात असतो, तो आपल्या हृदयीची भाषा जाणतो. तो जाणतो की, आपण नाम मनाने घेऊ इच्छितो; पण मन लागत नाही, असे जरी असेल, तरी ते त्याला ज्ञात आहे, काळजी करू नका. मन लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र करत रहा.

परमात्म्याने त्याची संपूर्ण शक्ती या नामात ठेवली आहे. नामजपाला काही विशिष्ट स्थळ-काळ-वेळ यांची आवश्यकता नाही. रात्रंदिवस रामनामाचा जप करावा, निषिद्ध पापाचरणांना आपोआप ग्लानी येईल. सध्या स्वतःचे अंतःकरण मलीन असते; म्हणून ती चांगली वाटते; पण शुद्धी झाल्यावर मलीन करणार्‍या वस्तूंचे आकर्षण उरतच नाही.’

– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)