संपादकीय : काँग्रेसला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी !’

काँग्रेसचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांना लागलेली गोळी पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाब याच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्याची नव्हती, तर ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्पित एका पोलीस अधिकार्‍याची होती. त्या वेळी ते पुरावे लपवणारा देशद्रोही कुणी असेल, तर तो विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर भाजप तिकीट देत असेल, तर ‘हा पक्ष देशद्रोह्याला पाठीशी घालणारा आहे का ?’, हा प्रश्न आहे. या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर वडेट्टीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटले आहे,’ असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या विधानावरून वातावरण तापले असून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘वडेट्टीवार यांना कारागृहात पाठवण्याची शिक्षा केली पाहिजे’, असे म्हटले आहे, तर दुसरीकडे अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी याविषयी वडेट्टीवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. वडेट्टीवारांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपने त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला आहे. विजय वडेट्टीवारांच्या या आरोपांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावध भूमिका घेत या वक्तव्याविषयी अधिक बोलणे टाळले आहे.

काँग्रेसच्या नेत्यांची यापूर्वीची हिंदुद्वेषी वक्तव्ये !

१३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. परभणी येथे २० नोव्हेंबर २०२३ या दिवशी ते म्हणाले होते, ‘‘देशात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मुसलमान धर्म स्वीकारला असता, तर देशाचे २ तुकडे झाले असते.’’ मंदिरातील दानपेट्या काढल्या, तर पुजारी पळून जातील, असे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून ‘वडेट्टीवारांमध्ये किती प्रमाणात हिंदुद्वेष आहे’, याची प्रचीती येते. एस्.एम्. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा वडेट्टीवार दाखला देत असले, तरी मुश्रीफ हे संघाचे कट्टर विरोधक आहेत. प्रत्येक भाषणात मुश्रीफ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मोठी आतंकवादी संघटना असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकात संघाच्या विरोधात कोणतीही माहिती असू शकते; मात्र कोणताही पुरावा नसतांना वडेट्टीवार यांनी संघाविषयी केलेले वक्तव्य पूर्णपणे अर्थहीन आणि चुकीचे आहे. याविषयी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. कसाबच्या गोळीने मुंबई पोलिसांचे ३ धाडसी अधिकारी हुतात्मा झाले. त्यांपैकी हेमंत करकरे होते. स्वतः कसाबने न्यायालयात हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसला कसाबचे विधान खोटे सिद्ध करायचे आहे का? कसाब आणि अबू इस्माईल यांनी अनेक निष्पाप लोकांवर गोळीबार केला होता. कसाबने न्यायालयात हे मान्य केले आहे. त्याच आधारावर कसाबला शिक्षा झाली होती. मग कसाबचे वक्तव्य खोटे होते का ? २६/११ च्या आतंकवादी आक्रमणानंतर काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी ‘भगवा आतंकवाद’ म्हणत पुस्तकही प्रकाशित केले होते. ज्यामध्ये २६/११ चे पाकिस्तान पुरस्कृत आक्रमण, हे हिंदूंचे षड्यंत्र असल्याचे मांडण्यात आले होते. त्या वेळी आतंकवादी अजमल कसाब जिवंत पकडण्यात आला नसता, तर काँग्रेसने जगाला ‘हिंदूही आतंकवादी असतात’, हे सांगायला कमी केले नसते. हे सर्व मुसलमानांचे तुष्टीकरण आणि लांगूलचालन करण्यासाठी होते, हे त्रिवार सत्य आहे.

काँग्रेसचे सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन !

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील बस्तर परिसरातील अबुझमाडच्या अरण्यात घुसून सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दल यांच्या सैनिकांनी मिळून नुकतेच २९ नक्षलवादी ठार केले. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रिनेत यांनी या नक्षलवाद्यांना चक्क ‘हुतात्मा’ संबोधले, तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधातील या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय सैन्याने पाकमध्ये केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असो की, ‘एअर स्ट्राईक’ याविषयी शंका-कुशंका उपस्थित करणारे काँग्रेसी आता सैनिकांच्या नक्षलविरोधी कारवाईलाही खोटे ठरवण्याचा उद्योग करत आहेत, हे दुर्दैवच !  तसे पाहिल्यास काँग्रेसचा हिंदुद्वेष हा काही आजचा विषय नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असल्याचे सांगितले होते. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून कायमच काँग्रेसने सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास म्हणावा लागेल.  एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करण्यात आणि सैनिकांच्या शौर्याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात, तर आजकाल काँग्रेस आघाडीवरच असते. त्यामुळे वडेट्टीवारांचे हे वक्तव्य हे काँग्रेसच्या संस्कारांचेच उत्तम उदाहरण आहे. हिंदूंना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना काँग्रेसने कायमच कस्पटासमान लेखले आहे. काही दिवसांपूर्वी सांगली येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास देशात जातीजातीमध्ये विभाजन करेल’, असे सांगितले होते, हे सत्य आहे. ‘न्यायपत्र’ नामक काँग्रेसचे घोषणापत्र जर देशात लागू झाले, तर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत देशांच्या पंगतीत बसेल, अशी खरमरीत टीका देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली आहे. काँग्रेसच्या या घोषणापत्रात सांगितलेल्या गोष्टी, तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठिकठिकाणी घोषित करत असलेले त्यांचे मनसुबे पहाता, ते देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर भारत देशासाठीच धोकादायक असणार आहेत. ‘न्याय मंच’ या कार्यक्रमात बोलतांना लोकसंख्येच्या आधारावर संपत्तीचे वाटप करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करून झाल्यावर आता जाती-धर्मांच्या नावावर देशाच्या संपत्तीचे वाटप करण्याचा घाट काँग्रेस घालत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी विजय वडेट्टीवारसारख्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कायमचे घरी बसवावे, हेच योग्य ठरेल !

सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास !