१. साधकांना असलेली श्री गुरुदर्शनाची ओढ
‘एकदा एक नवविवाहित साधक दांपत्य वैवाहिक जीवनाला आरंभ करण्यापूर्वी श्री गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात आले होते. त्यांच्या समवेत त्यांचे काही नातेवाईकही होते. ते नातेवाईकही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. नातेवाइकांपैकी एक साधिका श्री गुरूंशी बोलत असतांना त्यांचा पुष्कळ भाव जागृत झाला. त्या स्वतःच्या इच्छा आणि त्यांना असलेली काळजी सर्वकाही श्री गुरूंना सांगत होत्या. त्या सांगत असतांना त्यांना पुष्कळ रडूही येत होते. त्या वेळी श्री गुरूंनी त्यांना अत्यंत प्रेमाने समजावले. श्री गुरु त्यांना म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सगळं नीट होईल.’’ त्या एखाद्या लहान आणि निरागस बालकाप्रमाणे श्री गुरूंशी बोलत होत्या. श्री गुरूंनी दिलेल्या उत्तरांनी पूर्ण समाधानी होऊन त्या बोलत होत्या.
नंतर दुसर्या एक नातेवाईक साधिका श्री गुरूंशी बोलू लागल्या. तेव्हा त्यांना तर कितीतरी वेळ बोलताच येत नव्हते. त्या कितीतरी वेळ निःशब्द झाल्या होत्या. त्यांचेही बोलणे पहिल्या साधिकेसारखेच होते. ‘विवाह सोहळा पहाणे आणि नातेवाइकांच्या भेटी होणे, यांपेक्षा श्री गुरूंच्या दर्शनाला जाता यावे’, यासाठी त्यांची तळमळ होती. त्यांच्या घरचे वातावरण प्रतिकूल आहे. त्यामुळे त्यांना विवाहाला जायला मिळण्याविषयी साशंकता होती. त्यांनी पुष्कळ प्रार्थना केल्या. अखेरीस त्यांना श्री गुरूंच्या दर्शनाचे भाग्य लाभले.
आणखी एक नातेवाईक साधिका तेथे उपस्थित होती. त्यांचीही अवस्था तशीच होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्या इकडे पोचल्या होत्या.
या सगळ्यांची विवाहाच्या वेळी येणार्या अनुभूती, नातेवाइकांच्या भेटीचा आनंद, या सर्वांपेक्षा श्री गुरूंना भेटण्याची आणि त्यांच्या दर्शनाची तळमळ मोठी होती.’
२. ध्वनीचित्रीकरणाच्या संकलनाची सेवा करतांना श्री गुरुभेटीविषयी जाणवलेली सूत्रे मी त्या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या संकलनाची सेवा करत होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.
२ अ. प्रत्येक भक्ताला इष्ट देवतेच्या दर्शनाला जातांना माहेरी जात असल्यासारखे वाटणे आणि सनातनच्या साधकांचीही श्री गुरूंच्या दर्शनाच्या वेळी अशीच स्थिती होत असणे : त्या तिघींचे श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) समवेतचे संभाषण ऐकतांना मला संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची आठवण झाली,
‘आपुल्या माहेरा जाईन मी आतां ।
निरोप या संतां हातीं आला ।।
सुख दुःख माझें ऐकिलें कानीं ।
कळवळा मनीं करुणेचा ।।’
– तुकाराम गाथा, अभंग १५८७, ओवी १ आणि २
अशीच काहीशी स्थिती प्रत्येक भक्ताची भगवंताच्या, इष्ट देवतेच्या दर्शनाला जातांना होत असते, असे अनेक संतांच्या अभंगांतून लक्षात येते. सनातनच्या साधकांचीही श्री गुरूंच्या दर्शनाच्या वेळी अशीच स्थिती होत असते.
२ आ. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम बघण्याच्या निमित्ताने किंवा काही काळ सेवेच्या निमित्ताने साधक येथे येतात; मात्र त्यांना खरी ओढ श्री गुरूंच्या दर्शनाची असते. साधक श्री गुरूंना स्वत:ची सुख-दुःखे सांगतात.
२ इ. श्री गुरु साधकांच्या अडचणी, शंका, त्यांची सुख-दुःखे कळवळ्याने, माऊलीच्या मायेने ऐकत असणे आणि ‘श्री गुरु वात्सल्यमय बोलण्यातून जणू साधकांच्या पाठीवरून मायेचा, ममतेचा हात फिरवत आहेत’, असे जाणवणे : श्री गुरुही साधकांच्या अडचणी, शंका, त्यांची सुख-दुःखे कळवळ्याने, माऊलीच्या मायेने ऐकतात. ते साधकांना धीर देतात आणि त्यांचे सांत्वन करतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून एवढे प्रेम झिरपत असते की, ‘त्या माध्यमातून श्री गुरु जणू साधकांच्या पाठीवरून मायेचा, ममतेचा हात फिरवत आहेत’, असे जाणवते.
२ ई. श्री गुरूंची प्रत्येक भेट साधकांना अविस्मरणीय, हवीहवीशी वाटणारी आणि आनंद देणारी असणे : श्री गुरूंची प्रत्येक भेट अविस्मरणीय, हवीहवीशी वाटणारी आणि आनंद देणारी असते. श्री गुरूंचे दर्शन आणि भेट यांविषयी असे म्हणावेसे वाटते,
‘येता माझिया गुरुगृहाला ।
घेता तयाच्या दर्शनाला ।।
देती सौख्य भारी मनाला ।
तेची पाठीराखा सर्व जगाला ।।’
– श्रीमती अलका वाघमारे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |