हमासची बाजू घेणार्‍या ‘अल्-जझीरा’ वृत्तवाहिनीवर इस्रायलकडून बंदी !

कार्यालयावर धाड घालून जप्त केले कॅमेरे !

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ७ महिने पूर्ण झाले आहेत. यात हमासची बाजू घेऊन इस्रायलविरोधी वार्तांकन केल्यावरून कतारची जागतिक वृत्तवाहिनी ‘अल्-जझीरा’वर इस्रायलने बंदी आणली. इस्रायलने आरोप केला की, ही वृत्तवाहिनी ‘हमास’चे मुखपत्र बनली आहे. बंदीच्या कारवाईनंतर सरकारी यंत्रणांनी जेरुसलेम येथील या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर धाड घातली. दूरसंचार मंत्री श्‍लोमो करही यांनी यासंदर्भात सांगितले की, कारवाईत वृत्तावाहिनीचे कॅमेरे आणि अन्य यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.

हमासला चिथावणी देणारी वृत्तवाहिनी ! – पंतप्रधान नेतान्याहू

नेतान्याहू

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करून सांगितले की, आम्ही सर्व संमत्तीने हा निर्णय घेतला आहे. अल्-जझीरा हमासला चिथावणी देणारी वृत्तवाहिनी आहे. दुसरीकडे ‘टाइम्स ऑफ इस्रायल’नुसार इस्रायलने ‘अल्-जझीरा’वर युद्ध भडकावण्याचा आणि इस्रायलची जगभरात प्रतिमा मलीन करण्याचा आरोप केला आहे. इस्रायली मंत्रीमंडळाने अल्-जझीरा ही हमासचे मुखपत्र झाल्याचा आरोप केला आहे.
ही बंदी केवळ ३१ जुलैपर्यंतच असून त्यात वाढ करण्यासाठी इस्रायली संसदेची अनुमती घ्यावी लागणार आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार बंदीच्या कारवाईमुळे इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थाची भूमिका निभावणारा कतार अप्रसन्न होऊ शकतो.

आमचा ‘हमास’शी संबंध नाही ! – ‘अल्-जझीरा’चे स्पष्टीकरण

‘अल्-जझीरा’ने इस्रायलमध्ये त्याच्या प्रसारणावर बंदी घातल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमच्या पत्रकारांचे भ्रमणभाष जप्त करण्याचा आदेश इस्रायलकडून देण्यात आला आहे. आमच्यावरील आरोप निराधार असून आमचा हमासशी कोणताही संबंध नाही. इस्रायलच्या या बंदीच्या कारवाईमुळे कतारचा युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांवरही परिणाम होऊ शकतो. उभय देशांमधील संबंधही खराब होऊ शकतात.

संपादकीय भूमिका 

इस्रायलप्रमाणे भारतानेही अशी धडक कृती करणे अपेक्षित. सातत्याने भारत नि हिंदूविरोधी निराधार वार्तांकन करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’, ‘अल्-जझीरा’ यांच्यावर भारतानेही बंदी घालून त्यांची भारतातील संपत्ती जप्त केली पाहिजे !