दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !; प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य…

आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !

मुंबई – ६ मे या दिवसापासून कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल, तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा दोन विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावर धावतील. काही कालावधीसाठीच या गाड्या धावतील.


प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना अपघात झालेल्या वयस्क मुसलमान आजोबांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा ताफा थांबवून प्रथमोपचार केले. त्यांच्या समवेत असलेला छोटा मुलगा रडत होता. त्याचे अश्रू पुसून त्याला स्वतःच्या ताफ्यातील गाडीत बसवून दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पाठवले.


म्हाळुंगे (पुणे) येथे गावठी मद्यासह ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !

पुणे – राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाच्या पथकाने म्हाळुंगे गावाच्या परिसरात गावठी मद्यासह सँट्रो कार असा २ लाख ६८ सहस्र २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत ३५ लिटर क्षमतेच्या १२ प्लास्टिक कॅन म्हणजे अनुमाने ४३ सहस्र २०० रुपये किंमतीचे मद्य जप्त केले आहे.


मुंबईमध्ये बेस्टच्या गाड्यांमध्ये बाँब ठेवण्याची अफवा !

मुंबई – नवी मुंबई येथून मुलुंड येथे जाणार्‍या एका बेस्टच्या बसमध्ये बाँब असल्याचा ई-मेल ४ मे या दिवशी दुपारी बेस्टच्या एका मेलवर आला. या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने हर्षिल पानवाला (वय २१ वर्षे) या तरुणाला कह्यात घेतले आहे. पुढील अन्वेषणासाठी त्याला रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात सुपुर्द करण्यात आले आहे. याविषयी माहिती प्राप्त होताच मुलुंड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नवी मुंबईतून मुलुंड येथे आलेल्या ६ बेस्ट गाड्यांची पडताळणी केली. त्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संशयास्पद वस्तू आढळली नाही.


धबधब्यावरून उडी मारणारा पर्यटक हरवला !

जव्हार – पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावरून २ पर्यटकांनी १२० फूट उंचीवरून खोल डोहात उडी मारली. पैकी एक माज शेख वर आलाच नाही, तर जोएफ शेख गंभीर घायाळ झाला आहे. ही घटना कॅमेरॅत चित्रीत झाली आहे. ५ मे या दिवशी ही घटना घडली. पर्यटकांना येथील पाण्याच्या आणि डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता. ते तरुण थेट धबधबा चालू होतो तेथे पोचले होते, तर तिसरा पर्यटक खाली डोहाजवळून त्यांचा व्हिडिओ काढत होता. दुसर्‍या पर्यटकाचा शोध चालू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली.

जव्हार (पालघर) येथील घटना