उकाड्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांना मिळणार लिंबूपाणी आणि शीतपेय ! – मुख्य निवडणूक अधिकारी

८० टक्क्यांहून अधिक मतदानाचा विश्वास

पणजी, ५ मे (वार्ता.) – उकाड्यामुळे राज्यातील सर्व १ सहस्र ७२५ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या निवडणुकीत ८० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा विश्वास आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘उत्तर गोव्यात ४३, तर दक्षिण गोव्यात ४५ मिळून एकूण ८८ आदर्श मतदान केंद्रे,  महिलांसाठी दोन्ही मतदारसंघांत एकूण ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे (या केंद्रांचे व्यवस्थापन केवळ महिलाच हाताळणार आहेत), दोन्ही मतदारसंघांमध्ये एकूण ४० पर्यावरणपूरक मतदान केंद्रे, उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ३ मिळून विकलांग व्यक्तींसाठी एकूण ८ मतदान केंद्रे आहेत, ज्याचे व्यवस्थापन केवळ विकलांग अधिकारीच हाताळणार आहेत. विकलांग व्यक्तींसाठीच्या मतदान केंद्रांमध्ये ‘व्हील चेअर’वर जाण्यासाठी ‘रॅम्प’ असणार आहे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये ‘ब्रेल’ सुविधा (अंध मतदारांना मतदान करण्यास सुलभ होईल, अशी सुविधा), साहाय्यासाठी कार्यकर्ते आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

यंदा प्रथमच गोव्यात ३ युवा मतदान केंद्रे

मुख्य निवडणूक कार्यालयाकडून निवडणुकीत प्रथमच उत्तर गोव्यात पणजी आणि कुंभारजुवे येथे, तसेच दक्षिण गोव्यात मडगाव येथे युवा मतदान केंद्रे (युनिक पोलिंग स्टेशन) उभारण्यात येणार आहे. पुरातन वारसा स्थळी ही मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

मतदान केंद्रांमध्ये ज्येष्ठ मतदारांसाठी वैद्यकीय सेवा

राज्यात ८ आदर्श मतदान केंद्रांमध्ये ज्येष्ठ मतदारांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्येष्ठ मतदारांची संख्या अधिक असलेल्या शहरी भागांतील मतदान केंद्रांमध्ये ही सुविधा पुरवण्यात आली आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मतदार मतदानानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करू शकणार आहेत. या केंद्रांमध्ये आरोग्य संचालनालयाचे आधुनिक वैद्य ही सेवा पुरवणार आहेत.

मतदान करतांना छायाचित्र असलेले ओळखपत्र समवेत असणे सक्तीचे !

मतदारांना मतदान करतांना सोबत मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड, पॅन कार्ड आदी छायाचित्र असलेले ओळखपत्र समवेत असणे बंधनकारक आहे.

दीड मासाच्या कालावधीत १७ कोटी १२ लक्ष ९ सहस्र ९४८ रुपये किमतीचा ऐवज कह्यात

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर १६ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या विविध विभागांनी अमली पदार्थ, मद्य, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि यांसह अन्य मिळून एकूण १७ कोटी १२ लक्ष ९ सहस्र ९४८ रुपये किमतीचा ऐवज कह्यात घेतला आहे.