निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांचा आक्षेप (?)

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर…

‘लोकसभा निवडणूक २०२४’च्या मतदानाच्या २ फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. ७.५.२०२४ या दिवशी तिसर्‍या फेरीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये एक बातमी प्रकर्षाने लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे पहिल्या दोन फेर्‍यांचे मतदान झाल्यानंतर बर्‍याच दिवसांनी निवडणूक आयोगाने मतदानाच्या टक्केवारीचे अधिकृत आकडे घोषित केले आहेत. प्रत्यक्ष मतदान झाले, त्या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा निवडणूक आयोगाने उशिरा घोषित केलेल्या मतदानाच्या टक्केवारीत जवळजवळ ६ टक्क्यांची तफावत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांतील नेते आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

१. मतदान यंत्रामध्ये हस्तक्षेप करण्यात येत असल्याविषयी विरोधी पक्षांनी घेतलेली संदिग्ध भूमिका !

जवळजवळ प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर एक सूत्र भाजपविरोधक उपस्थित करतात, ते म्हणजे मतदान यंत्रात (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोळ केला जाऊ शकतो. त्याविषयीची उलटसुलट वृत्ते प्रसिद्धीमाध्यमांमधून प्रकाशित झाल्याचे वाचकांना स्मरत असेलच. भाजपविरोधी पक्ष वर्ष २०१४ पासूनच्या निवडणुकीपासूनच ‘भाजप मतदान यंत्रांत (इ.व्ही.एम्.) हस्तक्षेप (हॅक) करतो’, अशी ओरड करत आहेत; मात्र गेल्या १० वर्षांत यासंदर्भात भाजपविरोधी पक्षांपैकी एकानेही ठोस भूमिका घेतलेली नाही. सर्वाेच्च न्यायालयात काही अशासकीय संस्थांनी (‘एन्.जी.ओं.’नी) केलेल्या याचिकांव्यतिरिक्त विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या निकालांनंतर प्रसिद्धीमाध्यमांमधून स्वतःच आक्षेप नोंदवण्यापलीकडे जाऊन काहीही केलेले नाही. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षांच्या या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभे करत आवाहन केले होते, ‘मतदान यंत्रांविषयीचे आक्षेप जोपर्यंत पूर्णपणे दूर होत नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्षांनी आंदोलन करावे. सर्वाेच्च न्यायालयात आणि जनतेत जाऊन आपली भूमिका पटवून द्यावी, तसेच आवश्यकता भासल्यास निवडणुकांवर बहिष्कार घालावा.’ विरोधी पक्ष यांपैकी काहीही करत नाहीत.

श्री. धैवत वाघमारे

२. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी ठोस भूमिका घेणे अपेक्षित !

आताही मतदानाची टक्केवारी घोषित करण्यावरून विरोधी पक्षांना आक्षेप असेल; ‘त्यात घोटाळा झाला आहे’, असे वाटत असेल, तर त्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला न्यायालयात खेचावे. ‘पुढील संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालून निवडणूक जोपर्यंत निष्पक्ष वातावरणात होत नाही’, तोपर्यंत निवडणुका न लढवण्याची भूमिका घ्यावी. जनतेत जाऊन याविषयी स्वतःचे म्हणणे मतदारांना पटवून द्यावे; पण तसे ते करतांना दिसत नाहीत.

‘केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाऊन कांगावा केल्याने जनतेत संभ्रम निर्माण करता येऊ शकतो; मात्र जनतेचा विश्वास जिंकता येत नाही, तर त्यांनी जनताभिमुख काम करून दाखवावे’, हे भाजपविरोधी पक्षांनी आता लक्षात घ्यायला हवे.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२४)