कीर्तनातून मतदानाविषयी जागृती
सातारा – लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर सकल ग्रामस्थांनी भर द्यावा. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. आपल्या एका मताने या लोकशाहीचा राजा ठरत असतो. आपले एक मत अत्यंत बहुमोल आणि महत्त्वाचे आहे. मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ! प्रामाणिक काम करणार्या, विकास करणार्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन संत साहित्य अभ्यासक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केले. ते माण तालुक्यातील बीजवाडी येथे झालेल्या हरिनाम सप्ताहात बोलत होते.
ह.भ.प. अक्षय महाराज भोसले म्हणाले, ‘‘कीर्तनाच्या नामचिंतन महोत्सवा एवढाच लोकशाहीचा हा महोत्सव महत्त्वाचा आहे. सकाळी लवकर उठून प्रथम टप्प्यात सर्वाधिक मतदान होणे अपेक्षित आहे. घरातील लग्नसराई, व्यक्तिगत कार्यक्रम यांसाठी आपण जितक्या तत्परतेने काम करतो तितक्याच तत्परतेने आपण मतदानासाठी लोकांना प्रेरित केले पाहिजे.’’ या प्रसंगी उपस्थितांनी कीर्तनातून अशा प्रकारे महत्त्वपूर्ण विषयांवरती चिंतन करत समाज जागृती केली जात आहे. याबाबत टाळ्यांच्या गजरात या प्रबोधनाचे कौतुक केले.