‘इ.व्ही.एम्.’आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन यांचा इतिहास अन् काम समजून घ्या !

‘इ.व्ही.एम्.’ यंत्राचे भाग – व्हीव्हीपॅट (मध्यभागी), बॅलेट यूनिट (उजवीकडे), कंट्रोल यूनिट (डावीकडे)

लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान ७ मे या दिवशी होणार आहे. यापूर्वी २ टप्प्यांचे मतदान देशभरात झाले आहे. यामध्ये ज्या यंत्रांद्वारे मतदार मतदान करतात, त्या ‘इ.व्ही.एम्.’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांविषयी माध्यमांवर विविध प्रकारचे संदेश अन् वृत्ते प्रसारित झाली आहेत. मतदारांचे मौल्यवान मत जपणार्‍या आणि भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाहीला जी स्थानापन्न करणे आदी महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या या दोन्ही यंत्रांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

टीप : १. ‘इ.व्ही.एम्.’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) म्हणजे मतदान यंत्र.

२. ‘व्हीव्हीपॅट’ हे भारतीय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान यंत्राच्या शेजारी ठेवण्यात येत असलेले एक यंत्र आहे. मतदान केल्यानंतर मत कुणाला दिले आहे, हे दाखवणारी चिठ्ठी त्या यंत्रातून बाहेर येते अन् ७ सेकंदांत ती परत जाते.

१. ‘इ.व्ही.एम्.’ आणि व्हीव्हीपॅट’ची निर्मिती !

‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ (इ.व्ही.एम्.) आणि ‘व्हीव्हीपॅट’ निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (दोन्ही संरक्षण विभागाच्या अंतर्गत सार्वजनिक उपक्रम) यांनी केली आहे.

२. काय आहे ‘इ.व्ही.एम्.’ ?

इ.व्ही.एम्.मध्ये २ युनिट्स असतात. एक असते कंट्रोल युनिट (नियंत्रण ठेवणारे यंत्र) आणि दुसरे ‘बॅलेट’ (मतपत्रिका) युनिट. एक ‘बॅलेट’ युनिट १६ उमेदवारांसाठी (नोटासहित – उमेदवारांना नाकारण्यासाठीचा पर्याय) वापरता येते. ३८४ उमेदवारांकरता २४ बॅलेट युनिट्स एकत्रितरित्या एका कंट्रोल युनिटसह वापरता येऊ शकतात.

३. ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) काय आहे ?

‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ ही मतदान यंत्राला संलग्न; पण स्वतंत्र अशी प्रणाली आहे. जिच्यामुळे मतदारांना त्यांचे मत त्यांनी दिल्यानुसारच नोंदवले गेले आहे, हे पडताळता येते.

४. ‘इ.व्ही.एम्.’चा इतिहास !

वर्ष १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस्.एल्. शकदर यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याविषयी सूतोवाच केले. वर्ष १९८०-८१ मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (ई.सी.आय्.एल्.) आणि ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (बी.ई.एल्.) यांनी इ.व्ही.एम्. विकसित करून प्रदर्शित केले. वर्ष १९८२-८३ मध्ये केरळमधील पारूर येथील ५ मतदान केंद्रामध्ये प्रथम इ.व्ही.एम्. यंत्र वापरण्यात आले आणि त्यानंतर ११ विधानसभा मतदारसंघातील ८ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात वापरण्यात आले.

५. सर्वाेच्च न्यायालयाने घातली होती बंदी !

वर्ष १९८४ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत सर्वाेच्च न्यायालयाने इ.व्ही.एम्.चा वापर करण्यावर बंदी घातली. वर्ष १९८८ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. १५ मार्च १९८९ पासून इ.व्ही.एम्. वापरण्यास प्रारंभ करण्यात आला. वर्ष २००० पासून सर्व निवडणुकांमध्ये इ.व्ही.एम्. वापरण्यास येत आहे. वर्ष २०१८ मध्ये पुन्हा मतपत्रिकांचा वापर करावा, याविषयीची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली.

६. ‘इ.व्ही.एम्.’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन काम कसे करते ?

मतदान यंत्रावर मतदार बटण दाबून मत देतो, तेव्हा त्या बटणावरील लाल दिवा चमकतो. त्याच वेळी व्हीव्हीपॅट प्रिंटरवर उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असलेली एक पावती (स्लीप) छापली जाते. एका पारदर्शक पटलाद्वारे ती ७ सेकंदापर्यंत त्याच स्थितीत रहाते. त्यानंतर ही मुद्रित पावती आपोआप कापली जाते आणि व्हीव्हीपॅटच्या सीलबंद ड्रॉप-बॉक्समध्ये पडते. त्यानंतर मतदान यशस्वीरीत्या नोंदवले गेले आहे, याची निश्चिती होण्यासाठी ‘कंट्रोल युनिट’मधून बीपचा आवाज येतो.

(साभार : मासिक ‘लोकराज्य’, मार्च-एप्रिल २०२४ (महाराष्ट्र शासन))