Reports On Pesticides Baseless:१० पट अधिक कीटकनाशकांची अनुमती देण्याची सर्व वृत्ते निराधार !

  • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ची) स्पष्ट भूमिका !

  • जागतिक स्तरावरील मानकांपेक्षा ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ची पुष्कळ अल्प कीटकनाशकांना अनुमती !

नवी देहली – अनेक प्रसारमाध्यमांनी दावे केले होते की, ‘भारतीय अन्न नियंत्रक’ हे औषधी वनस्पती आणि मसाले यांमध्ये निर्धारित मानकांपेक्षा १० पट अधिक कीटकनाशके वापरण्यास अनुमती देते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने या सर्व वृत्तांना बिनबुडाचे म्हणत त्यांचे खंडण केले आहे. यावर प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करत म्हटले की, अशा सर्व बातम्या निराधार आणि खोट्या आहेत.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. भारतातील ‘कमाल अवशेष पातळी’ (मॅक्झिमम रेसिड्यू लेव्हल) ही जगातील सर्वांत कठोर मानकांपैकी एक आहे. कीटकनाशकांसाठीही अशी पातळी असून वेगवेगळ्या अन्न सामग्रीसाठी ती स्वतंत्रपणे निर्धारित केली जाते.

२. तथापि आम्ही मान्य करतो की, काही कीटकनाशकांची पातळी १० पट वाढवण्यात आली होती. ही कीटकनाशके भारतातील केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती यांमध्ये नोंदणीकृत नाहीत. त्यांच्यासाठी ही मर्यादा ०.०१ मिलीग्रॅम/किलोवरून ०.१ मिलीग्रॅम/किलोपर्यंत १० पट वाढवण्यात आली. हेसुद्धा वैज्ञानिक गटांच्या शिफारसीनुसारच केले गेले.

३. भारतात केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडे २९५ हून अधिक कीटकनाशके नोंदणीकृत आहेत. यांपैकी १३९ कीटकनाशके मसाल्यांमध्ये वापरता येतात.

४. मिरची पावडरमध्ये मिसळल्या जाणार्‍या ‘मायकोब्युटॅनिल’ या कीटकनाशकासाठी ‘कोडेक्स’ या मानके प्रस्थापित करणार्‍या जागतिक संस्थेने २० मिलीग्रॅम/किलोची कमाल मर्यादा ठरवली आहे, तर आम्ही ती केवळ २ मिलीग्रॅम/किलोपर्यंत मिसळण्याची अनुमती देतो.

५. याचे अन्य एक उदाहरण देतांना प्राधिकरणाने ‘स्पायरोमेसिफेन’चे मानक समोर ठेवले. ‘कोडेक्स’ने ५ मिलीग्रॅम/किलोची मर्यादा ठरवली असली, तरी आम्ही पाच पट अल्प म्हणजे केवळ १ मिलीग्रॅम/किलोपर्यंतच अनुमती देतो.

संपादकीय भूमिका

भारतीय मसाले आणि अन्य अन्नपदार्थ यांवर आरोप करणार्‍या विदेशी आस्थापनांकडे आता वैज्ञानिक पुरावे मागितले पाहिजेत, अन्यथा त्यांना भारताची क्षमा मागण्यास बाध्य केले पाहिजे !