पुणे – आतापर्यंत अनेक जणांवर आरोपपत्र प्रविष्ट झाले आहेत. हे सगळे दबावतंत्र असल्याचे बोलले गेले; मात्र तसे असते, तर संजय राऊतही भाजपमध्ये आले असते. भाजपमध्ये सर्व निर्णय हे केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतले जातात. मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी देहलीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ (‘केवळ राष्ट्र, महाराष्ट्र नाही’) अशीच आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. पुणे येथे पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. विनोद तावडे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते. युती म्हणून लढलो, बाळासाहेबांची मते मिळाली; मग आम्हाला सोडून जाता, याला गद्दारी म्हणत नाहीत. आम्ही विचारांवर युती केली होती.