कोल्हापूर- देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ सिद्ध केले आहे. या ‘ॲप’द्वारे दिव्यांग मतदारांना त्यांचे सूचीतील नाव पडताळता येते, तसेच मतदान कक्षापर्यंत पोचण्यासाठी चाकाच्या आसंदीची मागणी करता येते. मतदार ओळखपत्रात दुरुस्तीची विनंती करणे, मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडून घेणे, तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर प्रकारच्या सेवा आणि निवडणूक लढवणार्या उमेदवारांची माहिती या ॲपद्वारे मिळू शकते. दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना येणार्या समस्येविषयी तक्रार नोंदवण्याची सोय या ‘ॲप’वर आहे. यावर मतदान केंद्रांबद्दल माहिती, मतदान केंद्राचे स्थळ, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता, मतदान अधिकार्यांचा संपर्क तपशील मिळतो, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी दिली आहे.