कोल्हापूर, ४ मे (वार्ता.) – भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु होण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ते ‘महासैनिक दरबार हॉल’ येथे उद्योजक, अधिवक्ता, लेखापरीक्षक, व्यावसायिक यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शनात बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर भाजप खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, सुनील देवधर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘बी न्यूज’चे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्यातील क्षमता ओळखून त्याप्रमाणे मोठे व्यवसाय उभे करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. हुपरी येथील चांदी उद्योगासाठी ‘सिल्व्हर डिझाईन इन्स्टिट्यूट’, इचलकरंजी येथे ‘टेक्सटाईल डिझाईन इन्स्टिट्यूट’ चालू करण्याची आवश्यकता आहे. येथे मोठ्या प्रमाणात ‘फाऊंड्री’, तसेच अभियांत्रिकी कारखाने असल्याने कोल्हापूर जिल्हा दुचाकी-चारचाकी गाड्यांचे भाग बनवणारे मोठे केंद्र होऊ शकते, असे ते म्हणाले.
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना विचारलेल्या काही प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे
१. यापुढील काळ हा ‘हायड्रोजन’ वायू आणि द्रवरूप चालणार्या इंधनाचा आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
२. चांगल्या प्रकारच्या आणि दीर्घ पल्ल्यांच्या रस्त्यांसाठी चारचाकी वाहनांची वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतिघंटाहून अधिक वाढवली पाहिजे, यासाठी मीही सहमत आहे; मात्र देशात वाढत्या अपघातांची संख्या पहाता सध्यातरी ते शक्य नाही. वेग वाढवण्याच्या प्रस्तावावर विविध राज्ये आणि केंद्र यांची सहमती होत नाही.