दीड महिन्यात महाराष्ट्रात २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

लोकसभा निवडणूक २०२४

मद्य, दागिने यांसह एकूण ५३० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई !

मुंबई, ३ मे (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मद्य, पैसे आणि अमली पदार्थ यांच्या वापराची भयावह स्थिती पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून तब्बल २२० कोटी ६५ लाख रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले. यासह ३६ कोटी ८० लाख रुपयांचे मद्यही पकडण्यात आले आहे. याखेरीज ४९ कोटी ९५ लाख रुपये इतकी रोख रक्कम, तर १२९ कोटी ८९ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू पकडण्यात आल्या आहेत.

रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ, दागिने आदी पकडण्यात आलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य ५३० कोटी ६९ लाख रुपये इतके आहे. १ मार्च ते २ मे या कालावधीत केंद्र आणि राज्य शासन यांच्या विविध यंत्रणांच्या कारवायांमध्ये ही रक्कम अन् वस्तू पकडण्यात आल्या.

शेकडो लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

राज्यात वितरीत करण्यात आलेल्या एकूण ७८ सहस्र ४६० शस्त्रांपैकी ५० सहस्र ३९७ शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. १ सहस्र ११० शस्त्रांस्त्रांचे परवाने रहित करून ती जमा करण्यात आली आहेत. तब्बल १ सहस्र ५९५ अवैध शस्त्रे पकडण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेकडो लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्‍या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !