गडचिरोलीत सुगंधित तंबाखूसह ४ जण कह्यात
गडचिरोली – पानठेला आणि किराणा दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणार्या ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कह्यात घेतले. त्यांच्याकडून १८ लाख २७ सहस्र रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला आहे.
महाड येथील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण !
पनवेल – महाड येथील सभा संपताच इंदापूरला जात असतांना लोणेर वीर दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात मारामारी झाली. आमदार भरत गोगावले यांच्यावरील टीकेचा बदला म्हणून विरोधकांकडून ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण करण्यात आल्याचे समजते. यात गाडीची हानी झाली आहे.
सुषमा अंधारेंना बारामतीला नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर पडले
महाड – सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाड येथे उतरतांना सकाळी ९ वाजता कोसळले. स्थानिकांच्या साहाय्याने पायलटला बाहेर काढल्याने पायलट सुरक्षित आहे. सुषमा अंधारे आणि अन्य हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर पडल्याने मोठा अनर्थ टळला. महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या. अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. हेलिकॉप्टर पडण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
सर्वजण थोडक्यात बचावले !
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा नोंद
ठाणे – खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सराफाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आला आहे.
काळेवाडी फाटा (पिंपरी) येथे गुन्हेगार रिहान शेख याचा खून
पिंपरी (पुणे) – १ मे या दिवशी काळेवाडी फाटा येथे सराईत गुन्हेगार रिहान शेख याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध घेणे चालू केले. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शेख याच्यावर पिंपरी, चिंचवड शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे.
अकोला येथे चारचाकी वाहनांच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू !
अकोला – जिल्ह्यातील पातूर शहरालगत ३ मे या दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २ चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ सदस्यांचा समावेश आहे. यात ९ मासांच्या बाळाचाही समावेश आहे. या घटनेत ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणार्या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही कारचा चुराडा झाला. स्थानिक गावकर्यांनी याची माहिती तातडीने रुग्णवाहिका सेवा आणि पोलीस यांना दिली.