शिकण्याची वृत्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या अकलूज (सोलापूर) येथील चि.सौ.कां. सायली डिंगरे !

‘१.५.२०२४ या दिवशी पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा करणारी आणि मूळची अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील चि.सौ.कां. सायली डिंगरे आणि विरार (जिल्हा पालघर) येथील चि. सुमंत लुकतुके यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली चि.सौ.कां. सायली डिंगरे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. सुमंत लुकतुके आणि चि.सौ.कां. सायली डिंगरे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व

चि.सौ.कां. सायली डिंगरे

सायली अनुमाने २१-२२ वर्षांची असतांना रामनाथी आश्रमात साधना करण्यासाठी आली. तिने वृत्ते (बातमी) बनवणे, लिखाणाचे संकलन करणे, ‘सनातन प्रभात’ विशेषांकांशी संबंधित सेवा आदी विविधांगी सेवा करत त्या सेवांमध्ये प्रावीण्य मिळवले. हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य होय !

२. शिकण्याची वृत्ती

तिला सतत नवीन सेवा शिकण्याची आवड आहे. दैनिकात सेवा करणार्‍या साधकांना सहसा ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयांवरील लिखाणाची निवड किंवा त्यावर संपादकीय संस्करण करणे सोपे जाते. सायली ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयांवरील लिखाण, तसेच ‘अध्यात्म अन् साधना’ या विषयांवरील अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, साधकाची गुणवैशिष्ट्ये आदी लिखाणाची निवड करणे, त्यातील महत्त्वाची सूत्रे घेणे आदी सेवाही तेवढ्याच कौशल्याने करत असे.

३. चांगली आकलनक्षमता

सायलीने अल्पावधीत दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयातील विविध सेवा शिकून घेतल्या. तिने स्वतःला कोणतीही चौकट न घालता संपादकीय संस्करण आणि पृष्ठरचना, अशा दोन्ही सेवा शिकून घेतल्या. तिला या दोन्ही सेवांच्या संदर्भातील बारकावे ठाऊक आहेत. त्या सेवांशी निगडित कोणतीही अडचण आल्यास साधक तिला त्या संदर्भात विचारत असत.

४. सेवेची तळमळ

ती ‘सेवा नवीन आहे, तर मला जमेल का ?’, असा विचार न करता कोणतीही सेवा शिकून घेण्यासाठी सिद्ध असे. सायली ‘सेवेत चुका होतील’, असा विचार न करता धडाडीने सर्व सेवा करत असे. ती ‘चुकांतून शिकून त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्नरत असे.

५. नेतृत्वगुण

तिला पुढाकार घेऊन एखाद्या सेवेचे नियोजन करणे चांगले जमते. ती आश्रमातील वार्ताहर शिबिरांमध्ये चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन वार्ताहर साधकांना विविध वैचारिक स्तरांवरील सेवा शिकवत असे. वार्ताहर साधकांनाही तिचा आधार वाटतो.

६. भाव

सायली करत असलेल्या आध्यात्मिक लिखाणामध्ये तिच्यातील भाव दिसून येत असे. तिच्या लिखाणात बुद्धी आणि भाव यांचा सुंदर संगम असे. तिचा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न असे.’

– दैनिक कार्यालयातील सर्व साधक (२५.४.२०२४)