इस्रायलने इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या एका अधिकार्‍याला ठार मारले !

डिसेंबर २०२३ मध्ये घटना घडल्याचा दावा !

तेहरान (इराण) – इस्रायलने तेहरानमध्ये इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या सशस्त्र गटाच्या एका अधिकार्‍याची कथितपणे हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्यावर गोळीबार करून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘इराण इंटरनॅशनल’ या वृत्तसंस्थेने हा अहवाल दिला आहे. ही घटना डिसेंबर २०२३ मध्ये घडली, असे हा अहवाल सांगतो. जर्मनीमध्ये ज्यूं धर्मियांवरील आक्रमणाच्या योजनेत हा अधिकारी सहभागी असल्याचा दावाही याद्वारे केला गेला आहे. हे आक्रमण कसे आणि कुठे झाले ? याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेविषयी उभय देशांनी कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

जर्मनीतील आक्रमणाच्या कटात हमासशी संबंधित ७ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने १४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यामध्ये ‘मोसाद’ आणि ‘शिन बेट’ या इस्रायलच्या गुप्तचर संघटनांनी डेन्मार्कमधील ७ आतंकवाद्यांना अटक केलेल्या त्यांच्या संपूर्ण अन् व्यापक गुप्तचर तपासासाठी डॅनिश गुप्तचर संस्थांचे कौतुक केले. अलीकडच्या वर्षांत हमास जगभरात, विशेषतः युरोपमध्ये त्याची उपस्थिती वाढवत आहे, जेणेकरून तो ज्यू, इस्रायली आणि पाश्‍चात्त्य लक्ष्यांवर आक्रमणे करू शकेल, असेही इस्रायलकडून त्या वेळी सांगण्यात आले होते.