Indian Navy Chief : अ‍ॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी भारताचे नवे नौदलप्रमुख !

समुद्रातील युद्धे जिंकण्याचा माझा एकमेव प्रयत्न असणार ! – अ‍ॅडमिरल त्रिपाठी

नौदलाचे नवे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी

नवी देहली – अ‍ॅडमिरल आर्. हरि कुमार हे नौदलप्रमुख म्हणून सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अ‍ॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी २६ वे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ३० एप्रिलच्या दुपारी ही घोषणा करण्यात आली. अ‍ॅडमिरल त्रिपाठी हे एक ‘कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक’ युद्धतज्ञही आहेत.

१५ मे १९६४ या दिवशी जन्मलेले अ‍ॅडमिरल त्रिपाठी १ जुलै १९८५ या दिवशी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त झाले. एक संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतज्ञ म्हणून त्यांनी जवळपास ३९ वर्षांची प्रदीर्घ सेवा केली आहे. नौदल उपप्रमुख पदाचे दायित्व स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पश्‍चिम नौदल कमांडचे ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ’ म्हणून काम केले.

भारतीय नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये आमचे नौदल युद्धासाठी सज्ज, एकसंध आणि विश्‍वासार्ह विभाग म्हणून विकसित झाले आहे. सागरी क्षेत्रातील विद्यमान आणि उदयोन्मुख आव्हाने सांगतात की, भारतीय नौदलाने समुद्रातील संभाव्य शत्रूंना रोखण्यासाठी अन् समुद्रात युद्धे जिंकण्यासाठी नेहमीच सिद्ध असले पाहिजे. हे माझे एकमेव लक्ष्य आणि प्रयत्न असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय नौदलाला ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नरत राहीन. ‘या माध्यमातून भारतीय नौदलाला ‘विकसित भारता’चा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनवून आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळकट करीन’, असा संकल्पही अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी व्यक्त केला.