Indian Embassy Attack Case : भारतीय दूतावासावरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अमेरिका १ वर्षांनंतर करत आहे कारवाई !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे १८ मार्च २०२३ या दिवशी भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या खलिस्तान्यांच्या आक्रमणाच्या प्रकरणी सरकारने १० आरोपींविरोधात लुकआऊट नोटीस (पसार आरोपींना शोधण्यासाठीची एक प्रक्रिया) प्रसारित करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. ‘या आक्रमणात सहभागी असलेल्या खलिस्तानी संघटनांना यापुढे आंदोलक मानले जाणार नसून त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून कारवाई केली जाईल’, असे अमेरिकेची गुन्हे अन्वेषण यंत्रणा ‘एफ्.बी.आय.’ने  सांगितले. एफ्.बी.आय. अशा संघटनांवर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्याची योजना आखत आहे आणि अनेकांची नावेही निश्‍चित केली आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी अशा खलिस्तान समर्थक संघटनांच्या कारवायांना अमेरिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत ठेवले होते.

१. आक्रमणाच्या वेळी खलिस्तान्यांनी वाणिज्य दूतावासात घुसून आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या आक्रमणात दूतावासाची हानी झाली होती, तर काही अधिकारी घायाळ झाले होते. यानंतरही, म्हणजे १ जुलै २०२३ च्या मध्यरात्री खलिस्तानी पुन्हा दूतावासात घुसले आणि त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

२. एफ्.बी.आय.च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, खलिस्तानी गुन्हेगारांचे नाव आणि पारपत्र याखेरीज बायोमेट्रिक्स (हाताचे ठसे आदी माहिती) माहिती द्यावी. या माहितीमुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होईल.

३. एफ्.बी.आय. खलिस्तानी संघटनांना मिळणार्‍या आर्थिक स्रोताचीही चौकशी करत आहे. खलिस्तानी संघटनांचे समर्थक तस्करीसारख्या गुन्ह्यांत सहभागी आहेत, असे यापूर्वीच उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका

एका वर्षांनंतर अमेरिका याविषयी कारवाई करते, यावर तरी कसा विश्‍वास ठेवायचा ? जगाला आणि भारताला दाखवण्यासाठी अमेरिका कारवाई करण्याचे नाटक करत आहे का ? हे पहायला हवे. अमेरिका भारताचा मित्र नाही, हे कायम लक्षात ठेवायला हवे !