७६ कोटी रुपयांची रक्कम अडकली, आतापर्यंत केवळ ३२ गुन्ह्यांचा लागला शोध !
नागपूर – नागपूर येथे १ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सायबर पोलीस ठाण्याची स्थापना झाली. वर्ष २०२२ म्हणजे स्थापनेच्या वर्षी या पोलीस ठाण्यात ८ गुन्हे नोंद झाले. त्यात १ कोटी १ लाख २ सहस्र ७८५ रुपये रक्कम गुंतलेली आहे. वर्ष २०२३ मध्ये ११७ आर्थिक घोटाळे झाले. या घोटाळ्यात ७० कोटी ४२ लाख ८९ सहस्र ०००१ रुपये इतकी, तसेच २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रविष्ट २७ गुन्ह्यांत ६ कोटी १३ लाख ९२ सहस्र ९६७ रुपये रक्कम गुंतल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण ७६ कोटी ६६ लाख ९३ सहस्र रुपयांची रक्कम यात गुंतलेली आहे.
केवायसी योग्य नसल्याने सीम कार्डची माहिती मिळत नाही, सायबर फसवणूक करणार्यांचे पत्ते खोटे असतात, बनावट केवायसीच्या आधारे खात्याची ओळख पटत नाही, भौगोलिक परिस्थिती, स्थानिकांचे साहाय्य मिळत नाही, डिजिटल व्यवहार असल्याने पटकन पैसे वळते होतात, पोलिसांकडे त्याची अनुमती नसते, अशा अडचणी या गुन्ह्यांचे अन्वेषण करतांना येतात, असे पोलिसांनी सांगितले.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत प्रविष्ट झालेले गुन्हे, त्यात गुंतलेली रक्कम, किती गुन्ह्यांचा शोध लागला आदी माहिती मागितली होती. त्याच्या उत्तरात ३२ गुन्ह्यांचा शोध लागल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये डेबीट क्रेडीट कार्डचा १, ट्रेडलाईक टास्कचे ३७, क्रिप्टो करंसीचे ४, फेक प्रोफाईलचे ६ गुन्हे प्रविष्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वर्ष २०२३ मध्ये एकूण ३४ सायबर गुन्हेगारांना शोधण्यात आले. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयात एकूण १३ खटले प्रविष्ट आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी हे करावे !
‘ओटीपी’ कुणालाही न देणे, कोणतीही वैयक्तिक माहिती अज्ञातांना न देणे, कोणतीही ‘लिंक’ न उघडणे, ‘फेक कॉल्स’ना उत्तर देणे टाळणे, कोणतेही अनधिकृत व्यवहार न करणे या गोष्टी नागरिकांनी पाळल्या पाहिजेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.