परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ केले. त्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी आनंदप्राप्तीसाठी साधनेसंबंधी अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक लहान-मोठी प्रवचने घेणे, असे विविध मार्ग अवलंबले. आता सर्वत्रचे सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व !

अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून भगवंताशी एकरूप व्हावे !

हिंदुत्वनिष्ठ  : जेव्हा माझी आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तेव्हा ‘मी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे’, असे मला वाटत नव्हते; पण माझे मन आनंदी आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आनंदी असणे महत्त्वाचे आहे. साधना करत गेलो, तर आनंदाचे प्रमाण वाढते आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळीवर सत्-चित्-आनंद म्हणजे ‘सच्चिदानंद’ आहे. बस ! त्या अवस्थेत आनंदाच्या समवेत ज्ञानसुद्धा असते.

आता तुम्ही साधनेत मागे वळून पहाणार नाही, म्हणजे तुमची साधना खंडित होणार नाही. तुमच्या मनोलयाला आरंभ झाला आहे.

हिंदुत्वनिष्ठ : जे माझी आध्यात्मिक पातळी सांगत आहेत, त्यांना कदाचित् माझ्या स्वभावदोषांविषयी ठाऊक नसेल. त्यामुळे मला अपराधी वाटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वतःचे स्वभावदोष ठाऊक असणे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे; कारण अधिकांश लोकांना स्वत:चे स्वभावदोषच ठाऊक नसतात. स्वतःचे स्वभावदोष ठाऊक आहेत, तर ते दूर कसे करायचे ? त्यासाठी स्वयंसूचना इत्यादी कशा घ्यायच्या ? हे अन्य साधकांना विचारा. नंतर एक एक करून स्वभावदोष जाईल आणि अहंही रहाणार नाही. ईश्वरामध्ये एकसुद्धा स्वभावदोष आणि अहंभाव नाही. जर आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे, तर आपले स्वभावदोष आणि अहं दूर करायचेच आहेत ना !

स्वतःच्या बळावर प्रयत्न न करता तुम्ही दुसर्‍यांचे साहाय्य घ्या. हिंदु जनजागृती समितीचे कार्य ही अध्यात्माची शाळाच आहे. शिष्य होईपर्यंत एकमेकांना साहाय्य करायचे. अध्यात्मात शिष्य होणे, म्हणजे पुढे संत होणे !

हिंदुत्वनिष्ठ : आपल्या मार्गदर्शनामुळे माझ्या शंकांची उत्तरे मिळाली. आता मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासाठी प्रयत्न करीन. मला समाधान मिळाले.