नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !

नगर – येथील ‘ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळा’च्या वतीने शनिवार, २७ ते सोमवार, २९ एप्रिल २०२४ या कालावधीत रासनेनगरमधील श्रीदुर्गामाता मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचनमालिकेचे आयोजन करण्यात आले आहे, तर २८ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. एस्.एम्. कुलकर्णी आणि श्री. अशोककाका भोंग यांनी दिली.

आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

ते म्हणाले, ‘‘श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त प्रथमच प्रवचनमाला आणि अभ्यासवर्ग यांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ येथील वेदांताचे गाढे अभ्यासक-आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले यांची २७ ते २९ एप्रिल या कालावधीत  सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत ‘सांख्ययोगातून शोकनिवृत्ती’ या विषयावर प्रवचनमाला होईल, तसेच २८ ते ३० एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते ११ या वेळेत समर्थभक्त सौ. शैलजाताई लुले या साईराज बंगला, ओंकार कॉलनी, रासनेनगर येथे ‘अंतर्भाव’ या विषयावर अभ्यासवर्ग घेतील.’’

नगरमध्ये प्रथमच होत असलेली प्रवचनमालिका आणि अभ्यासवर्ग यांचा जिज्ञासू अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळा’चे सर्वश्री सर्वोत्तम क्षीरसागर, राधेश्याम कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे.

सौ. शैलजा लुले

आचार्य डॉ. सुनीलदादा लुले हे होमिओपॅथी डॉक्टर असून वेदांताचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रे या वेदांतातील प्रस्थानत्रयीवर त्यांची प्रवचनमाला चालू असते. ओवीबद्ध आत्माराम या ग्रंथाचे ते लेखक आहेत. ‘आनंदाचे डोही’ या यूट्यूब चॅनलवर श्रीसमर्थ वाङ्मय आणि श्रीमद्भगवद्गीतेवर त्यांची ५०० हून अधिक प्रवचने उपलब्ध आहेत, तसेच उपनिषदादी वेदांत ग्रंथावर आणि श्रीशंकराचार्य यांच्या प्रकरण ग्रंथावर दररोज सकाळी ऑनलाईन अभ्यासवर्ग घेत आहेत.

आचार्य श्रीगुरु लुले यांच्या धर्मपत्नी सौ. शैलजा लुले या ‘जय जय शो शुद्धे’ या यूट्यूब चॅनलवर ‘परमार्थ विज्ञान आणि दासबोध’ या विषयावर प्रवचने देत आहेत.