आळंदी – आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या बैठकीत पालखी सोहळ्यातील सोयीसुविधा, समस्या आदी विषयांवर चर्चा झाली. २९ जून या दिवशी सायंकाळी माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. त्याच दिवशी दर्शन बारी मंडपात (आजोळी) माऊलींचा पहिला मुक्काम असेल. ३० जून आणि १ जुलै या दोन दिवशी पालखी पुण्यनगरीत मुक्कामी असेल, तर १६ जुलै या दिवशी पालखी पंढरपूर येथे पोचेल. ३२ दिवसांचा प्रवास करून पालखी पुन्हा ३० जुलैला आळंदीत परतणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.