शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य !

आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते. आज आपण आपल्या शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते ? ते समजून घेणार आहोत.

१. मूत्रपिंडाचे कार्य

आपल्या शरिरातील मूत्र मार्गाची ओळख होण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर चहा गाळण्याची क्रिया डोळ्यांसमोर आणावी लागेल. ज्याप्रमाणे चहा गाळणीतून कपात गाळला जातो, त्याप्रमाणे मूत्रपिंडांमध्ये येणारे रक्त गाळले जाते. गाळलेले रक्त मूत्रवाहिन्यांमधून मूत्राशयात जमा होत रहाते. मूत्राशय भरल्यानंतर मूत्र प्रवृत्तीची संवेदना निर्माण होऊन मूत्र  शरिराबाहेर टाकले जाते.

मूत्रपिंडाचे संग्रहित चित्र

अ. आपल्या शरिरात २ मूत्रपिंड असतात. मूत्रपिंडाच्या आत अनेक छोटे छोटे घटक रक्त गाळण्याची क्रिया करत असतात. त्यांना ‘नेफ्रोन’ असे म्हणतात.

आ. रक्त गाळले जात असतांना शरिरासाठी आवश्यक ते घटक शरिरात पुन्हा शोषले जातात आणि नको असलेले पदार्थ पुढे शरिराबाहेर टाकले जातात. दिवसभरात १५० ते १८० लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त गाळण्याची क्रिया मूत्रपिंडांमध्ये होत असते; परंतु केवळ १ ते २ लिटर इतकेच मूत्र शरिराबाहेर टाकले जाते.

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

इ. मूत्रपिंडाचे विविध कार्य : मूत्र तयार करून त्याद्वारे युरिया, क्रिएटिनिन, युरिक ॲसिडसारखे टाकाऊ पदार्थ आणि पाणी यांना शरिराबाहेर टाकणे.

इ १. शरिरातील पाण्याचे प्रमाण कायम राखणे.

इ २. शरिरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कायम राखणे.

इ ३. संप्रेरकांद्वारे (‘हार्मोन’द्वारे) रक्त निर्मितीसाठी प्रेरणा देणे.

इ ४. ‘रेनिन’ या पदार्थाद्वारे न्यून झालेला रक्तदाब वाढवण्यास साहाय्य करणे.

इ ५. मूत्रपिंडाच्या वर असलेल्या अंतःस्रावी ग्रंथी या शरिरातील चयापचय क्रियाही व्यवस्थित ठेवतात.

इ ६. आपण घेत असलेले औषध शरिराच्या बाहेर टाकण्यात मूत्रपिंड महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आपण कोणते औषध घेत आहोत ? वैद्यांच्या सल्ल्याने घेत आहोत ना ? याचे काय दुष्परिणाम आहेत ? याविषयी जागरूकता निर्माण होणे पुष्कळ आवश्यक आहे. कोणतेही औषध मनाने न घेता वैद्यांच्या सल्ल्याने घेणे महत्त्वाचे आहे. वेदना सहन होत नाहीत; म्हणून मनाने वेदनाशामक घेणे, मनानेच प्रतिजैविक औषधे घेणे, हे मूत्रपिंडाचे कार्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते.

२. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यास उद्भवणारे आजार

अशा प्रकारे मूत्रपिंड आपल्या शरिरात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. एक मूत्रपिंड निकामी झाल्यास दुसर्‍या मूत्रपिंडाचा पर्याय उपलब्ध असतो; परंतु दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यास मात्र आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. मूत्रामध्ये पाणी, क्षार आणि प्रथिने यांच्या चयापचयातील टाकाऊ पदार्थ असतात; परंतु विविध आरोग्याच्या तक्रारी असल्यास लघवीची चाचणी करून आजाराचे निदान केले  जाते. उदा. मधुमेहाच्या विकारात लघवीमध्ये साखर आढळून येते, मूतखडा असल्यास लघवीमध्ये लालपेशी आढळून येतात, मूत्रमार्गात जंतूसंसर्ग झाला असल्यास पू निर्माण करणार्‍या पेशी आढळतात, तसेच युरिया, युरिक ॲसिड किंवा क्रिएटिनिन यांचे प्रमाण लघवीमध्ये अधिक आढळून येणे, हे विविध आजारांच्या संदर्भाने, तसेच मूत्रपिंडाचे कार्य नीट होत नसल्याचे दर्शवते.

पुढील लेखामध्ये आपण मूत्रमार्गाचे विविध आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी जाणून घेऊया.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२३.४.२०२४)