सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता श्री. निषाद देशमुख यांना स्वतःमध्ये जाणवलेले आध्यात्मिक पालट !

१. स्वतःकडून इतरांसाठीही प्रार्थना होणे

श्री. निषाद देशमुख

१ अ. स्वतःकडून तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी प्रार्थना होणे : ‘जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेनंतर मी कुठल्याही देवळात गेल्यावर अधूनमधून माझ्याकडून आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी (सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. राम होनप आणि मी) पुढे दिल्याप्रमाणे प्रार्थना होऊ लागली.

१. ‘हे देवा, आम्हा सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ज्ञानप्राप्तीच्या सेवेसाठी प्राणशक्ती मिळू दे.’

२. ‘हे देवा, आम्हा सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांभोवती तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे. अनिष्ट शक्ती आमच्यावर सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे.’

३. ‘हे देवा, आम्हा सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना यज्ञ किंवा कुठलेही विशेष कार्यक्रम यांचे निर्विघ्नपणे सूक्ष्म परीक्षण करता येऊ दे.’

४. ‘हे देवा, आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या सेवेत येणारे ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक’, असे सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊ देत.’

माझ्याकडून अशा प्रार्थना कुटुंबातील सदस्यांसाठीही कधी उत्स्फूर्तपणे होत नाहीत. केवळ आई गंभीर रुग्णाईत असतांना माझ्याकडून काही वेळा तिच्यासाठी प्रार्थना झाल्या; पण नंतर झाल्या नाहीत.

१ आ. ‘स्वतःचा आध्यात्मिक त्रास वाढू नये’, यासाठी काही दिवस इतरांसाठी प्रार्थना न करणे; पण नंतर पुन्हा आपोआप प्रार्थना केल्या जाणे : माझ्याकडून अशा प्रार्थना होऊ लागल्यावर ‘समष्टी प्रार्थनांमुळे माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ होईल’, असे मला वाटले; म्हणून मी साधारणपणे १५ – २० दिवस प्रयत्नपूर्वक अशा प्रार्थना करणे टाळत होतो; पण असे केल्यामुळे मला प्रार्थना करण्याचे समाधान मिळत नव्हते. त्यामुळे १५ – २० दिवसानंतर मी पुन्हा माझ्याकडून उत्स्फूर्तपणे ज्या प्रार्थना होत होत्या, त्या करू लागलो.

वरील पालटांविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारले, तेव्हा त्यांनी ‘हा चांगला पालट आहे’, असे मला सांगितले.

२. जुलै २०२३ च्या गुरुपौर्णिमेनंतर सोपे आणि संक्षिप्त ज्ञान मिळणे

अ. जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेपूर्वी मला मिळत असलेले ज्ञान सर्वसामान्य वाचकाला कळण्यास कठीण असायचे. आता मला सोपे आणि संक्षिप्त स्वरूपात ज्ञान मिळत आहे.

आ. आधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मला ज्ञान सोपे करून लिहिण्याविषयी सांगावे लागायचे. आता मी ज्ञान सोपे करून लिहितो; पण त्यामुळे सुश्री (कु.) मधुरा भोसले आणि श्री. राम होनप यांच्या तुलनेत माझ्या ज्ञानाच्या धारिका मोठ्या होतात.

इ. आधी माझ्या ज्ञानात १० – १२ वाक्यांचा एक परिच्छेद असायचा. जुलै २०२३ नंतर ५ – ६ किंवा त्याहून अल्प वाक्यांचा परिच्छेद होत आहे.

३. ऑक्टोबर २०२३ मध्ये रामनाथी आश्रमात झालेल्या ‘दशमहाविद्या’ यागानंतर जाणवलेले पालट !

ऑक्टोबर २०२३ मध्ये महर्षींच्या मार्गदर्शनानुसार रामनाथी येथील आश्रमात घटस्थापना ते दसर्‍यापर्यंतचे १० दिवस देवीच्या दशमहाविद्या रूपांसाठी याग करण्यात आले. त्यानंतर जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

३ अ. मन शांत होऊन देहात गारवा जाणवणे, त्यामुळे देहात उष्णता जाणवूनही मनाला समाधान वाटणे : या यागानंतर मला ‘मनाला शांत वाटणे आणि देहाच्या आत गारवा जाणवणे’, असे अनुभवता येत आहे. माझी प्रकृती उष्ण असल्यामुळे मला थंडीच्या दिवसातही मला देहाच्या आत उष्णता जाणवून उष्णतेचा त्रास व्हायचा. मला आताही कधी-कधी उष्णता जाणवते; पण देहाच्या आत असलेल्या गारव्यामुळे मनाला समाधानाची एक वेगळीच अनुभूती येते.

३ आ. बोलण्याचे प्रमाण उणावणे : अलीकडे काही दिवसांत माझ्या बोलण्याचे प्रमाणाही उणावले आहे. तसे मला इतर साधकांनीही सांगितले. मी या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारल्यावर त्यांनी ‘बर्हिमुख वृत्ती न्यून होऊन वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे, असे पालट जाणवत आहेत’, असे मला सांगितले.

४. कृतज्ञता

‘गुरुकृपेने माझ्यात होत असलेले पालट मला अनुभवता आले आणि त्या पालटांचे लिखाणही करता आले’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक