साधनेने आमूलाग्र पालट झालेले पनवेल येथील कै. लक्ष्मण बाजीराव जोशी (वय ७४ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२६.१२.२०२३ या दिवशी पनवेल येथील कै.लक्ष्मण बाजीराव जोशी (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि साधनेमुळे त्यांच्यामध्ये झालेले सकारात्मक पालट येथे दिले आहेत.

कै.लक्ष्मण बाजीराव जोशी

१. श्रीमती सुनंदा लक्ष्मण जोशी (कै. लक्ष्मण बाजीराव जोशी यांची पत्नी, वय ६३ वर्षे)

श्रीमती सुनंदा लक्ष्मण जोशी

१ अ. आरंभी यजमानांचा साधनेला विरोध असणे; पण कालांतराने त्यांनी स्वतः साधना करण्यास आरंभ करणे : ‘वर्ष २००० मध्ये मी साधनेत आले. तेव्हा यजमानांचा माझ्या साधनेला विरोध होता. वर्ष २००५ मध्ये एम्.एफ्. हुसेन यांच्या देवतांच्या विडंबनात्मक चित्रांच्या विरोधातील स्वाक्षरी मोहिमेत यजमान प्रथमच सहभागी झाले. त्या वेळी ते स्वामी समर्थांचा जप करत असत, तसेच ते श्रीकृष्णाची भक्तीही करत होते. त्यानंतर मी त्यांना सांगितल्यानुसार ते ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागले. नंतर हळूहळू ते साधना करू लागले आणि त्यांचा विरोध उणावला.

१ आ. पत्नीला प्रसारासाठी बाहेरगावी जाण्यास अनुमती देणे आणि घरातील सर्व कामे करून प्रसाराची सेवा करणे : त्यांनी मला प्रसारासाठी बाहेरगावी जाण्यास अनुमती दिली. मी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या सभेच्या संदर्भातील सेवेसाठी जाऊ शकले. त्यानंतर मी ३ वर्षे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जाऊ शकले. मी सेवेसाठी घराबाहेर गेल्यावर यजमान घरातील सर्व कामे करत असत, तसेच ते स्वयंपाक करून स्वतः सेवेलाही जात असत.

१ इ. सेवेची तळमळ : त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, प्रायोजक मिळवणे, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे, अशा सेवा केल्या. त्यांना चालतांना धाप लागायची, तरीही ते थोडे थांबून नंतर पुढे जायचे आणि सेवा पूर्ण करायचे.

१ ई. नामजप करणे, भजने आणि प्रवचने ऐकणे : ते सवा करून आल्यावर रात्री २ घंटे नामजप करायचे आणि नंतर जेवण घ्यायचे. शेवटच्या ३ मासांत त्यांनी डॉ. शंकर अभ्यंकर यांचे ‘श्रीमद्भागवत’ आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकली, तसेच त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला.

१ उ. निधन होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे : २५.१२.२०२३ या दिवशी त्यांनी खोकल्याचे औषध घेतले नव्हते. याविषयी आम्ही त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी आज औषध घेणार नाही; कारण मी आज जाणार आहे. मग मी औषध कशाला घेऊ ?’’ त्यांनी तुळशीचे पान तोंडात ठेवले आणि म्हणाले, ‘‘मी उद्या नसेन.’’ तेव्हा त्यांना अशक्तपणा होता; म्हणून मुलाने त्यांना दुपारी ४.३० वाजता ग्लुकोज चढवण्यासाठी रुग्णालयात नेले. दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

२. श्री. सुदर्शन लक्ष्मण जोशी (कै. लक्ष्मण बाजीराव जोशी यांचा मोठा मुलगा) (वय ३६ वर्षे)

श्री. सुदर्शन लक्ष्मण जोशी

२ अ. साधनेत येण्यापूर्वी वडिलांची स्थिती

२ अ १. दुसर्‍यांना साहाय्य करणे : ‘बाबांचा मूळ स्वभाव फार चांगला होता. कुणालाही पैशांची आवश्यकता असेल, तर त्याला ते आपल्या जवळील पैसे देऊन टाकत; मात्र यामुळे आमच्या कुटुंबाला अडचण येत असे, तरीही ते उद्याची पर्वा करत नसत.

२ अ २. वाईट संगत लागल्यामुळे कमावलेला पैसा वाया घालवणे : वर्ष १९९५ मध्ये ते ‘इस्टेट एजन्ट’चा व्यवसाय करत असत; परंतु वाईट संगत, राजकारण आणि दारू यांत अडकून त्यांनी कमावलेला पैसा वाया घालवला. ते त्यांच्या वाईट मित्रांमध्ये अडकले होते. याच कारणामुळे आई-बाबांचे प्रत्येक रात्री भांडण व्हायचे.

२ अ ३. देवपूजा मन लावून करणे : बाबा घरी मन लावून देवपूजा करत असत. त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा होती. साधनेत येण्यापूर्वीच त्यांनी घरामध्ये ४ ते ५ फूट उंचीचे श्रीकृष्णाचे बासरीवादन करणारे चित्र लावले होते. ते पाहून आमचाही भाव जागृत होत असे.

२ आ. वडिलांविषयी पूर्वग्रह असणे आणि त्यांना चुका सांगितल्यावर पश्चात्ताप होऊन त्यांनी साधनेला आरंभ करणे : २००७ नंतर आम्ही सर्व बदलापूरला रहायला आलो. त्यानंतर आम्हा चौघांची साधना अधिक चांगली होऊ लागली; परंतु माझ्या मनात लहानपणापासून वडिलांविषयी पूर्वग्रह होता. एकदा मी त्यांना त्यांच्या चुका सांगितल्या. तेव्हा त्या चुकांचा त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते पुष्कळ रडले. त्यानंतर ते स्वतः नामजप आणि सेवा करू लागले आणि त्यांनी कुटुुंबियांना साधनेत साहाय्य केले. त्या प्रसंगानंतर माझ्या मनातले सर्व पूर्वग्रह निघून गेले. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच घडले.

२ इ. सेवाभाव

१. बाबांना पूर्वीपासून चालतांना दम लागत असे. बदलापूरमध्ये पुष्कळ उंच इमारती असून तेथे उद्वाहक यंत्रे (लिफ्ट) नाहीत. त्यामुळे त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यास प्रत्येक इमारतीत पायर्‍या चढून जावे लागायचे.

२. आई ३ वर्षे सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात सेवेला गेली होती. आम्ही दोघे भाऊ नोकरी करत होतो. नंतर त्यांनीच घर सांभाळले आणि थरथरत्या हातांनी जेवण बनवून आम्हा दोन्ही मुलांची सेवा केली.

३. त्यांना मार्गात शेजारी, सुरक्षारक्षक, दुकानदार, रिक्शावाला इत्यादी भेटल्यास ते सर्वांना साधना सांगत असत. त्यांचे पुष्कळ समवयीन मित्र झाले होते.

२ ई. बाबांविषयी लोकांच्या मनात फार चांगली प्रतिमा निर्माण होणे : घराजवळील शेजारी-पाजारी ज्यांना आम्ही ओळखतही नाही, ते लोक बाबांच्या निधनानंतर आम्हाला भेटायला आले. तेव्हा त्यांचे मनोगत ऐकल्यावर आम्हाला समजले की, ‘बाबा त्यांना साधनेविषयी सांगायचे. त्यामुळे त्या लोकांच्या मनात बाबांविषयी चांगली प्रतिमा निर्माण झाली होती.’ आमच्या शेजारच्या एक काकू म्हणाल्या, ‘‘ ते फार सज्जन आणि परोपकरी होते.’’

२ उ. साधनेमुळे बाबांमध्ये झालेले पालट

२ उ १. मुलाला कामावरून येण्यास विलंब झाल्यास तो येईपर्यंत न जेवणे आणि श्रीकृष्णाकडे एकटक पहात रहाणे : माझा लहान भाऊ (प्रतीक) तापट असल्याने त्यांना त्याची काळजी वाटायची. ते त्याला समजावतांना नेहमी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांची आठवण करून देत. तो रात्री कामावरून उशिरा येत असे. तोपर्यंत बाबा जेवत नसत आणि श्रीकृष्णाकडे एकटक पहात रहात. त्या वेळी ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे आम्हाला वाटत असे.

२ उ २. स्वतःकडून झालेल्या चुकांची जाणीव होणे : त्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना स्वतःकडून झालेल्या चुकांची जाणीव झाली होती. आधी ते मनोराज्यात रमत असत. या दोषाची जागा ईश्वरी अनुसंधानाने घेतली होती. बाबा आणि आई यांच्यात नेहमी काही न काही कारणावरून वाद होत असे; परंतु नंतर त्यांना ‘आई जे करते, ते सर्वांसाठी करत आहे’, याची जाणीव झाली होती.

२ उ ३. पत्नीने कुटुंबाची सेवा केल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : आई रुग्णाईत असतांना बाबा जेवण करणे, भांडी घासणे, अशी सर्व कामे करत असत आणि आईची काळजीही घेत. बाबांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस माझा लहान भाऊ प्रतीक काही कारणामुळे चिडचिड करत होता आणि आईचे ऐकत नव्हता. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले, ‘‘आईने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत. त्याची जाणीव ठेव. तिला त्रास देऊ नकोस.’’

२ ऊ. देवावरील श्रद्धा : बाबांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर विशेष श्रद्धा होती. त्यांनी प.पू. भक्तराज महाराजांचे चरित्र वाचले होते. ते कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमातही जाऊन आले होते. त्यांना देवपूजा करायला आवडायचे. त्यांना यथासांग पूजा केल्याविना चैन पडत नसे. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना आजारपणामुळे पूजा करता येत नसल्याने ‘माझे मन लागत नाही’, असे ते सारखे म्हणायचे.

२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक ! : एकदा आम्ही कटुंबीय रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले बाबांकडे पाहून म्हणाले, ‘‘तुमच्या चेहर्‍यावर पुष्कळ सात्त्विकता जाणवते.’’

३. श्री. प्रतीक लक्ष्मण जोशी  (कै. लक्ष्मण बाजीराव जोशी यांचा लहान मुलगा) (वय ३४ वर्षे)

श्री. प्रतीक लक्ष्मण जोशी

३ अ. वडिलांमध्ये झालेले चांगले पालट : ‘आम्ही लहान असतांना बाबांचे दारूचे व्यसन, राजकारणी आणि वाईट संगत, तसेच आईला मारहाण करून त्रास देणे यांमुळे आम्ही त्रस्त होतो. आईने साधना चालू केल्यावरही ते आईला विरोध करत होते; पण तो विरोध हळूहळू उणावून त्यांच्यात सकारात्मकता आली. त्यांची कुसंगत आणि दारू सुटली. आम्हाला त्रास देणारे नातेवाईकही आमच्यापासून दूर झाले. गुरुदेवांच्या कृपेने बाबांमध्ये पुष्कळ चांगले पालट झाले.

 

३ आ. बाबांच्या निधनानंतर कुटुंबियांनी स्थिर रहाणे : बाबांचे निधन झाल्यावर एका व्यक्तीने सांगितले, ‘तुमच्या घरी कुणाचे निधन झाले आहे’, असे वाटतही नाही.’ साधनेमुळे आम्ही कुटुंबीय या कठीण प्रसंगातही स्थिर होतो.’

४. सौ. श्रेया प्रतीक जोशी (कै. लक्ष्मण बाजीराव जोशी यांची सून, वय २५ वर्षे)

सौ. श्रेया प्रतीक जोशी

अ. ‘सासर्‍यांचा (बाबांचा) नामजप सतत चालू असायचा. ‘आता माझा मृत्यू होणार आहे’, असे बाबांनी सासूबाईंना सांगितले. तेव्हा बाबा स्थिर आणि शांत होते.

आ. बाबांच्या पार्थिवाकडे पाहून आम्हा सर्व कुटुंबियांना शांत वाटत होते. ‘ते कुणामध्येही अडकलेले नाहीत’, असे मला वाटले. माझ्या सासूबाई दुःख न करता स्थिर होत्या. तेव्हा आम्हा सर्व कुटुंबियांचा नामजप चालू होता.’