काँग्रेस मुसलमान आणि घुसखोर यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात !

डावीकडून पंतप्रधान मोदी आणि मनमोहन सिंह

बांसवाडा (राजस्थान) – आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, हे तुम्हाला हे मान्य आहे का ?

असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिलला येथे एका प्रचारसभेत जनतेला विचारला.

सौजन्य Zee News 

काँग्रेसचा शहरी नक्षलवादी विचार !

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसचे घोषणापत्रच सांगते की, ते (काँग्रेसवाले) देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचे मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत. कधीकधी ते दलित आणि आदिवासी जनतेमध्ये भीती पसरवतात. सध्या काँग्रेस राज्यघटना आणि आरक्षण यांवरून भीती पसरवत आहे. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, त्यांचे हे खोट अजिबात कामी येणार नाही; कारण दलितांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे.

पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहेत ! – काँग्रेसची टीका

पवन खेडा

पंतप्रधान मोदी यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले. निवडणूक जिंकण्यासाठी ते जनतेशी खोटे बोलतच रहातील. त्यांच्या हमी, विधाने आणि आश्‍वासने खोटी आहेत. ते हिंदु-मुसलमान यांच्या नावावर खोटे बोलून देशाचे तुकडे करत आहात. काँग्रेसच्या घोषणापत्रात कुठेही ‘मुसलमान’ आणि ‘हिंदु’ असे शब्द आहेत का ? ते सांगा, अन्यथा ते खोटे बोलत आहेत, असे आव्हान मी पंतप्रधानांना देतो. ते त्यांनी स्वीकारावे किंवा खोटे बोलणे थांबवा.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केलेले विधान !

वर्ष २००६ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान असलेले डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले होते की, देशाच्या विकासाची फळे एकसमान पद्धतीने अल्पसंख्यांकांना, विशेषत: मुसलमानांना मिळावीत, यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या साधन-सुविधांवर मुसलमानांचा पहिला अधिकार असायला हवा.