मुंबई – सरकारी मालकीची प्रसारण संस्था असलेल्या प्रसारभारतीने ‘डीडी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे. ‘नव्या अवतारासह बातम्यांच्या नव्या प्रवासाला’ असे ‘डीडी न्यूज’ने जाहीर केले आहे.
हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील भगव्या रंगातील दूरदर्शनच्या पहिल्या बोधचिन्हाचे अनावरण वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत दूरदर्शनच्या बोधचिन्हांच्या रंगात भगवा, निळा, हिरवा अशा रंगाचे पालट झाले. आता हे बोधचिन्ह पूर्णपणे भगव्या रंगात बनवण्यात आले आहे. ‘डीडी न्यूज’ने ‘एक्स’ सामाजिक माध्यमावरून १६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमधून हे बोधचिन्ह सादर करण्यात आले. ‘आमची मूल्ये तीच आहेत, आम्ही आता नव्या रूपात आलो आहोत, बातम्यांच्या अभूतपूर्व प्रवासासाठी सज्ज व्हा,’ असे त्यात म्हटले आहे.
(म्हणे) ‘दूरदर्शनने केलेले भगवेकरण धोकादायक !’
भगवेकरण झोंबल्याने तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांची टीका !
यावर ‘प्रसारभारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी टीका केली आहे. ‘राष्ट्रीय प्रसारण संस्था असलेल्या दूरदर्शनने बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे. हे भगवेकरण धोकादायक असल्याचे मला माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वाटते. प्रसारभारती आता ‘प्रचारभारती’ झाली आहे,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.