Israel Iran Conflict : इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सिद्ध ! – इस्रायल

इराण – इस्रायल तणाव

जेरुसलेम – इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर पश्‍चिम आशियात तणाव आणखी वाढला आहे. इस्रायलचे सैन्यदल इराणच्या आण्विक केंद्रांवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. इस्रायल प्रत्युत्तर देण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्ध मंत्रीमंडळाच्या बैठकीत इराणवरील आक्रमणाच्या  नियोजनावर चर्चा केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणची अनेक आण्विक स्थळे इस्रायलच्या निशाण्यावर आहेत.

बेंजामिन नेतन्याहू आणि अयातुल्ला अली खामेनी

प्रसंगी यापूर्वी कधीही न वापरलेली शस्त्रेही इस्रायलविरुद्ध वापरू ! – इराण

इस्रायलच्या वक्तव्यावर इराणने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या कोणत्याही आक्रमणाला त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी तेही सिद्ध आहेत. आवश्यकता पडल्यास यापूर्वी कधीही न वापरलेली शस्त्रेही वापरू, असेही ते म्हणाले.

इस्रायलला सैन्य साहाय्य चालू ठेवण्याचा अमेरिकेचा पुनरुच्चार !

अमेरिकेने पुन्हा एकदा इस्रायलच्या संरक्षणासाठी सैन्य सहाय्य चालू ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. इराणने १३ एप्रिल या दिवशी इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले होते. इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश सध्या समोरासमोर लढण्यास सिद्ध आहेत. सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत.