बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

६ जणांवर गुन्हा नोंद, मृत्यूपूर्वीच्या चित्रफीतीत शेजारी आणि शासकीय विभागाचा उल्लेख !

प्रतिकात्मक चित्र

बारामती (जिल्हा पुणे) – लाटे (ता. बारामती) येथील वृद्ध शेतकरी हनुमंत सणस यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विषारी औषध घेतल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये नेले होते. उपचारादरम्यान १४ एप्रिल या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. सणस यांनी मृत्यूपूर्वी ‘आपल्याला काही लोक आणि शासकीय विभाग त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशा आशयाची चित्रफीत सिद्ध करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यानुसार अभिजित उपाख्य बाबासाहेब घुले, अमर घुले, मोहन उपाख्य बजिरंग कोळेकर, संभाजी खलाटे, प्रकाश माने यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी जयवंत सणस यांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

१. लाटे गावच्या हद्दीमध्ये सणस यांची निरा नदीलगत भूमी आहे. तेथून कोणत्याही व्यक्तीला पाणी घेण्याची अनुमती नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून ८ शेतकर्‍यांना विनाअनुमती पाणी आणि वीज जोडणी दिली होती. त्यासाठी सणस यांच्या जमिनीतून ये-जा करत होते.

२. सणस यांनी अनेकवेळा पाटबंधारे विभाग, महावितरण आणि पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण सणस यांनाच धमकावले जात होते.

३. ‘विनाअनुमती मोटार पंपधारक तुमच्यावर गुन्हा नोंद करतील. तुम्हाला कारागृहामध्ये टाकतील’, असे सरकारी कर्मचारी त्यांना सांगत होते. (संबंधित विभागातील त्रास देणार्‍या कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोेंद करून त्यांना कडक शिक्षा द्यायला हवी ! – संपादक)

४. सणस यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित शासकीय कार्यालयांना निवेदनही सादर केले होते. ‘संबंधित विभागांकडून १५ मार्चपर्यंत मला न्याय मिळावा’, अशी विनंती केली होती. तसेच त्यानंतर मी माझे जीवन संपवणार असून त्याला ‘महावितरण’ची कोर्‍हाळे शाखा, वडगाव निंबाळकर जलसंपदा विभाग आणि वडगाव पोलीस ठाणे तसेच विनाअनुमती पाणी उचलणार्‍या लोकांचे दायित्व असेल’, असेही त्यात नमूद केले होते. (निवेदनाची वेळीच नोंद घेतली असती, तर शेतकर्‍याचा जीव वाचवता आला असता ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !