एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

योगऋषी बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी औषधांवर कथित टीका केल्याच्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेचे प्रकरण

सर्वोच्च न्यायालय आणि योगऋषी बाबा रामदेव

नवी देहली – योगऋषी बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी पुढील एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिशाभूल करणारे विज्ञापन प्रसिद्ध करून अ‍ॅलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नापसंती व्यक्त केली होती. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपिठाने म्हटले की, तुम्ही चांगले काम करत असाल; पण तुम्हाला अ‍ॅलोपॅथीला अपकीर्त करण्याचा अधिकार नाही. या सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या योगऋषी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी यापूर्वी मागितलेल्या बिनशर्त क्षमेचीही नोंद खंडपिठाने घेतली.

याआधी १० एप्रिल या दिवशी खंडपिठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची क्षमा स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोघांनीही जाहीर क्षमा मागण्याची सिद्धता असल्याचे दर्शवले. भारतीय वैद्यकीय संघटनेने अर्थात् इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रविष्ट (दाखल) केलेल्या नोटिशीला उत्तर देतांना त्यांनी ही बिनशर्त क्षमा मागितली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल या दिवशी होणार आहे.

संपादकीय भूमिका

  • सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?