सरकारी शाळांमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा गोवा शासनाचा स्तुत्य निर्णय !

केंद्रातील शिक्षण मंत्रालय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ योजनेच्या अंतर्गत निधी पुरवणार

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्‍या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील शिक्षण मंत्रालयाने सरकारी विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये येथील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींना त्यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्रातील शिक्षण मंत्रालय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणा’योजनेच्या अंतर्गत निधी पुरवणार आहे. ‘गोवा समग्र शिक्षा’ योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

विद्यार्थिनींना चाव्यांचा संच, दुपट्टा, मफलर, पेन किंवा पेन्सिल, बॅग, वही, छत्री, ‘हेअरपिन’, ‘सेफ्टी पिन’ आदी नित्य वापराच्या साहित्याचा स्वसंरक्षणासाठी कसा वापर करायचा ? याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कठीण काळात स्वसंरक्षणासाठी ‘मार्शल आर्ट्स’ न शिकताही मूठ, लाथ मारून किंवा दैनंदिन वापराचे साहित्य वापरून प्रतिकार कसा करता येतो ? याविषयी माहिती देण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विषयाचे सादरीकरण, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थिनींचा प्रत्यक्ष सहभाग या माध्यमांतून हा विषय विद्यार्थिनींना शिकवला जाणार आहे. ‘गोवा समग्र शिक्षा’ योजनेचे राज्य समन्वयक नागेंद्र कोरे म्हणाले, ‘‘हे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यालयाच्या व्यवस्थापनाला एका प्रशिक्षकाची नेमणूक करावी लागणार आहे. यासाठी ‘मार्शल आर्ट्स’ प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला प्रशिक्षक म्हणून नेमता येईल किंवा शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी पोलीस खात्यातील महिला पोलिसांचे साहाय्य घ्यावे लागेल. ही योजना २ – ३ मासांसाठी राबवली जाणार आहे आणि यामध्ये १ घंटा कालावधीचे सुमारे ५० वर्ग पूर्ण होणार आहेत. केंद्रशासन प्रशिक्षकासाठी प्रत्येक विद्यालयाला ३ मासांसाठी प्रतिमास ५ सहस्र रुपये याप्रमाणे निधी पुरवणार आहे.’’

महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी सरकारने गोवा शासनाचे अनुकरण करावे !