गुजरातमधील जैन दांपत्य २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करत घेणार संन्यास !

भावेश भंडारी आणि त्यांची पत्नी यांची काढण्यात आली मिरवणूक

कर्णावती (गुजरात) – राज्यातील हिम्मतनगर येथील एका व्यावसायिक दांपत्याने त्यांच्या २०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे दान करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नी यांनी फेब्रुवारी महिन्यातच सर्व धनसंपत्तीचा त्याग करून आध्यात्मिक मार्गाला वाहून घेणार, असा निर्णय घेतला होता. आता त्यांनी अधिकृतरित्या सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे. वर्ष २०२२ मध्येच त्यांच्या दोन्ही मुलांनी भिक्षू होण्याचा निर्णय घेतला होता. भंडारी दांपत्याच्या मुलांनी भौतिक आसक्तीचा त्याग करून ते जैन भिक्षू बनले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भंडारी दांपत्याने हे पाऊल उचलले.

२२ एप्रिल या दिवशी संन्यासी होण्याची शपथ घेतल्यानंतर दांपत्याला त्यांचे वैवाहिक संबंध सोडून सर्व भौतिक सुखांचा कायमचा त्याग करावा लागणार आहे. भिक्षूक झाल्यानंतर दांपत्याला केवळ २ पांढरी वस्त्रे, भिक्षेसाठी एक वाटी आणि ‘राजारोहण’ बाळगता येईल. जैन साधूजवळ बसतांना भूमी झाडण्यासाठी ‘राजारोहण’ नावाचा एक प्रकारचा झाडू असतो. बसण्याच्या जागेवरील कीटक बाजूला करून बसण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यातून अहिंसक मार्गाचा अवलंब केला जातो.

भंडारी दांपत्याची नुकतीच ४ किलोमीटरची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत त्यांनी त्यांचे भ्रमणभाष आणि इतर वस्तू दान केल्या. मिरवणुकीत रथात भंडारी दांपत्य राजेशाही कपड्यांमध्ये बसले होते.

संपादकीय भूमिका 

जैन समाजात भगवंताच्या प्राप्तीसाठी भौतिक सुखाचा त्याग केलेल्यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला जातो, तर हिंदूंमध्ये कुणी अध्यात्माच्या मार्गाला लागले, तर जन्महिंदू त्यांची खिल्ली उडवतात. हिंदूंची दुरवस्था का झाली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे काय ?