प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
आज तरुणांमध्ये धर्माविषयी उदासीनता दिसून येते, त्याची २ ते ३ कारणे लक्षात घेतली पाहिजेत.
अ. सर्वांत महत्त्वाचे कारण, म्हणजे धर्माविषयी नेमक्या ज्ञानाचा अभाव असणे.
आ. अन्य कारणे म्हणजे संस्कारांचा अभाव.
इ. विविध माध्यमातून उच्छृंखल आणि स्वैर वर्तनाचे आकर्षण वाढवले जात आहे. हिंदु तरुणांची जीवनपद्धत अनावश्यक व्यग्र करून ठेवली गेल्याने इतर काही वेळ रहातच नाही.
या परिस्थितीचे दायित्व कुणा एकावर ढकलणे योग्य नाही; कारण ही अवस्था एका पिढीत निर्माण झालेली नाही. अनेक पिढ्यांमधील तरुणवर्गाची स्थिती वरीलप्रमाणेच रहात गेली, त्याचे हे परिणाम आहेत. प्रत्येक पिढीतील काही सत्पुरुषांचा अपवाद वगळता बहुतेक बुद्धीमान आणि विचारवंत मंडळी यांनी ही परिस्थिती पालटण्याचे प्रभावी प्रयत्न केले नाहीत, उलट ती अधिक बिघडवण्यास थोडासा हातभार लावला. त्यांना आपण सत्पुरुष म्हणू, अशा अनेकांनी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केले; परंतु विकृत विचार मांडणार्यांची संख्या आणि प्रभाव मोठा असल्याने त्यांचा फारसा परिणाम झाला नाही.
धर्माविषयीचे सिद्धांत आचरणात उतरवून लाभ अनुभवल्यास उदासीनता न्यून होईल !
तरीसुद्धा आज अनेक तरुण धर्माविषयी जिज्ञासेने काही विचार आणि चर्चा करतात. चांगल्या सिद्धांतांची पुनर्स्थापना कशी करता येईल, याचा विचार करतात, असे दिसते. हे चांगले आशादायी लक्षण म्हटले पाहिजे. अर्थात् हे सगळे पूर्वज आणि संत -महात्म्ये यांच्या प्रयत्नाचेच फलित आहे, हे नाकारता येणार नाही. ज्या प्रमाणात धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट होत जातील, त्यातील दोष टाळून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवले जातील आणि त्याचे होणारे चांगले लाभ स्पष्ट होतील, त्या प्रमाणात ही उदासीनता अन् उपेक्षा न्यून होत जाईल.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)
धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे ! |