दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप . . . !

खोटा वाहनक्रमांक लावून गाडी वापरणार्‍यावर गुन्हा नोंद !

नाशिक – बोलोरो पिकअप परराज्यातील असतांना संशयित चालकाने खोटा वाहनक्रमांक लावून ती गाडी वापरली. ती गाडी स्वत:च्या नावावर करून घेतली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अक्षय लामखेडे असे संशयित चालकाचे नाव आहे.

संपादकीय भूमिका : कायद्याचे भय नसल्यानेच असे प्रकार केले जातात !


छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा बॅनर हटवला !

नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे एकत्रित चित्र असलेला बॅनर लावण्यात आला होता; पण वादाची शक्यता असल्याचे नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तो हटवण्यात आला. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. (मुळात आधी तो लावलाच का ? कुठे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे हिंदूंचे हत्याकांड घडवणारा टिपू सुलतान ! – संपादक)


१५ एप्रिलपर्यंत अवेळी पाऊस रहाणार !

मुंबई – येत्या १५ एप्रिलपर्यंत अवेळी पाऊस रहाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. येत्या २४ घंट्यांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे मुसळधार पावसाची शक्यताही वर्तण्यात आली आहे.


कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांची गाडी !

मुंबई – उन्हाळी सुटीत होणारी प्रवाशांची गर्दी पहाता लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम दरम्यान १६ साप्ताहिक विशेष फेर्‍या चालवण्यात येतील, हा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. १८ एप्रिल ते ७ जून या कालावधीत ही २२ डब्यांची गाडी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिवीम येथे पोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर ती थांबेल.


‘महानिर्मिती’कडे ६ दिवसांचा कोळसासाठा न्यून !

मुंबई – एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये विजेची मागणी अधिक असल्याने २२ दिवसांसाठी २९.७० लाख टन कोळसा साठा औष्णिक वीज उत्पादन आस्थापनांनी ठेवणे केंद्रीय ऊर्जा आयोगाने अनिवार्य केले आहे; मात्र त्या तुलनेत राज्य सरकारी ‘महानिर्मिती’ या वीज उत्पादन आस्थापनाकडे सरासरीपेक्षा सहा दिवसांचा साठा न्यून आहे. वीज उत्पादनासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचे आस्थापनाने म्हटले आहे.