‘स्मार्ट’ संस्थेच्या वतीने ‘सेव्ह मुंबई सेव्ह फ्रॉम फेक प्रोटेस्ट्स, ड्रग्ज, डेमोग्राफिक चेंज’ या विषयावर मुंबई येथे कार्यक्रम !
मुंबई – हल्लीच्या काही वर्षांत विविध विषय उपस्थित करून आंदोलनांतून देशाची कोट्यवधी रुपयांची हानी करण्यात आली. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) च्या विरोधासाठी आंदोलन आणि शेतकरी आंदोलन ही त्याची उदाहरणे आहेत. वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. ते ‘स्मार्ट’ या संस्थेच्या वतीने मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे ‘सेव्ह मुंबई सेव्ह फ्रॉम फेक प्रोटेस्ट्स, ड्रग्ज, डेमोग्राफिक चेंज’ या विषयावर ७ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे, ‘क्राईमफोबिया’ या संस्थेचे संस्थापक आणि क्रिमिनोलॉजिस्ट श्री. स्नेहिल ढाल आणि समाजसेविका सौ. प्रीती राऊत उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रती हेगडे यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश ‘स्मार्ट’ संस्थेच्या अनामिका तिवारी यांनी स्पष्ट केला. या कार्यक्रमाला राष्ट्रप्रेमी नागरिकांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ! – स्नेहिल ढाल
‘क्राइमफोबिया’चे संस्थापक आणि क्रिमिनोलॉजिस्ट श्री. स्नेहिल ढाल म्हणाले, ‘‘अमली पदार्थ आता केवळ चित्रपटसृष्टीपर्यंत मर्यादित राहिलेले नसून आता शाळकरी मुलांपर्यंतही हे वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून पोचले आहे. प्रतिष्ठा (प्रसिद्धी), सत्ता आणि पैसा यांसाठी अनेक गुन्हे घडतात, असा आमचा अभ्यास आहे. घडलेले गुन्हे, अपराध यांचे दस्तावेज सिद्ध करणे आवश्यक ठरते. न्यायालयात काही वेळा तज्ञांचे मत लागते, आदी गोष्टीसाठी आमची मदत घेऊ शकता. लोकांनीसुद्धा गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पुढाकार घ्यावा.’’
भारतातून हाकलले जाण्याची चिंता हिंदूंना असायला हवी ! – प्रसाद काथे
‘महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे म्हणाले, ‘‘हिंदू पूर्वी ‘हिंदुकुश’मध्ये म्हणजे आताचे पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया येथे होते. तो दिवस दूर नाही की, हिंदू वर्ष २०४७ मध्ये भारतातून हाकलले जातील. ही चिंता हिंदूंना असली पाहिजे. लोकसंख्येतील पालट आपले धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य यांवर आघात करतो. आपल्या आजूबाजूला बांधलेल्या अनधिकृत मजारी यांमुळे लँड जिहादला प्रारंभ होतो. एकंदरीत आपण लोकसंख्येतील पालटांकडे दुर्लक्ष केले, तर पुढे निर्माण होणार्या आव्हानांना आपणच उत्तरदायी असू.’’
एकही हिंदु मुलगी लव्ह जिहादची शिकार व्हायला नको ! – प्रीती राऊत
समाजसेविका प्रीती राऊत म्हणाल्या, ‘‘आपल्या मुली आपला अभिमान असतात. मुलींना अमली पदार्थ देण्यास भाग पाडून त्यांच्यावर दुष्कर्म केले जाते. अनेकदा मुलींच्या पालकांकडून सतर्कता नसल्याने मोठ्या संख्येने मुली लव्ह जिहादची शिकार होत आहेत. अशा युवतींना आम्ही धर्मांधांच्या तावडीतून सोडवून त्यांच्या पालकांकडे सोपवणार आहोत. एकही हिंदु मुलगी लव्ह जिहादची शिकार होऊ नये, यासाठी उपाययोजना केली पाहिजे.’’