Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

वॉशिंग्टन – गाझा युद्ध हाताळण्यास इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी चूक केली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे इस्रायलवर शस्त्रसंधीसाठी दबाव वाढला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही मित्रराष्ट्रांतील दरी आणखी वाढली आहे.
७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर झालेल्या आक्रमणानंतर जो बायडेन हमासच्या विरोधात इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचे प्रमुख समर्थक राहिले आहेत; परंतु गेल्या काही आठवड्यांत अमेरिकी प्रशासनाने इस्रायलच्या संदर्भात कडक भूमिका अवलंबली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. गाझातील दक्षिणेकडील राफा शहराविषयीची असहमती देखील मोठे कारण ठरले आहे. गेल्या आठवड्यात अन्नपुरवठा करणार्‍या ताफ्यावर इस्रायलने आक्रमण केले होते. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता.

इस्रायलची इराणवर आक्रमणाची धमकी

इराणने इस्रायलवर आक्रमण केल्यास इस्रायलचे सैन्य थेट इराणवर आक्रमण करील, अशी धमकी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतीच दिली.  सीरियातील इराणच्या राजदूत कार्यालयावरील हवाई आक्रमणात इराणच्या जनरलपदावरील अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता. या घटनेतून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.