US Envoy Eric Garcetti : जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची इच्छा असणार्‍यांनी भारतात यावे !

  • भारतातील अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांचे वक्तव्य !

  • ‘भारतात उपदेश करण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी येतो’, असेही वक्तव्य !

भारतातील अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी

नवी देहली : भारतात रहाणे माझ्यासाठी सौभाग्य आहे. तुम्हाला भविष्य पहायचे आणि अनुभवायचे असेल, तर भारतात या. ज्यांना जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचे असेल, त्यांनी भारतात यावे, अशा शब्दांत अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचे कौतुक केले आहे. वर्ष २०२४ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ८ टक्के रहाण्याचा अंदाज आहे. यामुळे अमेरिका भारताचे कौतुक करत आहे, असे मानले जात आहे.

गार्सेटी पुढे म्हणाले की,

अमेरिकी प्रशासन भारतासमवेतच्या संबंधांना पुष्कळ महत्त्व देते. आम्ही येथे शिकवण्यासाठी आणि उपदेश करण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी अन् शिकण्यासाठी आलो आहोत. (असे आहे, तर अमेरिकेतील भारतविरोधी षड्यंत्राच्या अंतर्गत अमेरिकी संस्थांनी भारतविरोधी विधाने आणि अहवाल प्रसारित करणे थांबवले पाहिजे, अशा शब्दांत भारताने अमेरिकेला सुनावले पाहिजे ! – संपदक)

संपादकीय भूमिका

  • आज भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली असून येणार्‍या दशकांमध्ये चीन आणि अमेरिका यांनाही ती शह देऊ शकते, हे अमेरिका जाणून आहे. त्यातच अमेरिकी अर्थव्यवस्थाही खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच ती भारताचे कौतुक करीत आहे, हे भारतीय जनता जाणून आहे !
  • असे आहे, तर ‘भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित आहेत’, ‘मणीपूर हिंसा’ अथवा ‘सीएए कायदा’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) यांवरून आम्ही चिंतित आहोत’, अशी वेळोवळी अमेरिकेकडून करण्यात आलेली विधाने अमेरिकी राजदूताने मागे घेतली पाहिजेत ! अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’, अशा प्रकारचीच भारताचे कोडकौतुक करणारी ही विधाने आहेत, असे म्हणावे लागेल !