गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकात एका वर्षातच झालेले पालट !

एका आस्थापनामध्ये चालू झालेल्या सत्संगातून गुरुकृपेमुळे मला साधना करण्याची संधी लाभली. एक वर्षाच्या कालावधीत गुरुकृपेमुळे माझ्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.

१. शारीरिक पालट

श्री. वेदांत सोनार

पूर्वी माझ्या चेहर्‍यावर पुष्कळ मुरुमे येत होती. त्यामुळे माझ्या चेहर्‍यावर पुष्कळ खड्डे पडत असत. पूर्वी मी रात्री अंथरूण ओले करत असे.(अंथरूणात लघवी होत असे.) मी या त्रासांसाठी अनेक आधुनिक वैद्यांनी सांगितलेले औषधोपचार केले; पण परिणाम झाला नाही. मी गुरुकृपेने साधनेत आल्यापासून आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आरंभ केल्याच्या दिवसापासून रात्री झोपेत अंथरूण ओले होणे बंद झाले आहे. माझ्या चेहर्‍यावर मुरुमे येण्याचे प्रमाण काही दिवसांतच न्यून होऊ लागले. मला पूर्वी मुरुमासाठी प्रतिदिन ६ गोळ्या घ्याव्या लागत असत.

ते आता बंद झाले.

२. पूर्वी दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पहातांना चांगले वाटत असणे; मात्र ‘साधना करतांना मिळणारा आनंद दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे’, याची जाणीव होणे

मी साधनेत येण्यापूर्वी मला एकटे रहायला आवडत असे. मला बाहेर जायला किंवा लोकांना भेटायला आवडत नसे. समाजातील लोक अपशब्द बोलतात, ते चांगले नसल्याने मला घरात आईच्या समवेत रहायला किंवा दूरचित्रवाहिन्यांवर लहान मुलांसाठी दाखवत असलेले ‘कार्टून’ पहातांना चांगले वाटत असे; मात्र मागील एक वर्षापासून प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) मला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहायची इच्छा झाली नाही आणि मी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहिले नाहीत. गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेत, म्हणजेच नामजप, सत्सेवा, गुरुस्मरण आणि सारणी लिखाण करण्यात इतका आनंद मिळतो की, त्या आनंदाची तुलना दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.

३. पूर्वी लोकांमध्ये मिसळायला न आवडणे; मात्र साधना चालू केल्यावर सेवेनिमित्त आश्रमात साधकांच्या समवेत रहायला आणि धर्मसेवा करण्यासाठी समाजातील व्यक्तींना भेटायला आवडू लागणे 

पूर्वी मला लोकांमध्ये मिसळायला आवडत नसे. मी नातेवाइकांच्या घरी अधिक दिवस रहात नसे. मी साधना चालू केल्यावर मला साधकांच्या समवेत रहायला, सेवा करायला आणि सेवेनिमित्त आश्रमात रहायला आवडू लागले. माझ्या लक्षात आले, ‘साधक नेहमी इतरांची काळजी घेतात. ते सर्वांशी जुळवून घेतात आणि सतत देवाची भक्ती करतात. साधक गुरूंचीच रूपे आहेत.’ आता मला धर्मसेवा करण्यासाठी समाजातील व्यक्तींना भेटायला पुष्कळ आवडते.

४. आत्मकेंद्रित वृत्ती नाहीशी होऊन ‘साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करावे’, असे वाटणे

मी साधनेत येण्यापूर्वी आत्मकेंद्रित होतो. मला ‘शिक्षण पूर्ण करून मोठा व्यावसायिक बनावे, मोठी गाडी घ्यावी, मोठे घर बांधावे’, असे वाटत असे. गुरुमाऊलींच्या कृपेने आणि आशीर्वादाने आता मला वाटते, ‘स्वतःचे संपूर्ण जीवन राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यात अन् साधना करण्यात व्यतीत व्हावे. माझ्या मनात ‘गुरुचरणप्राप्ती आणि हिंदु राष्ट्र’ यांविना अन्य विचार नसावा. मला केवळ गुरुभक्ती आणि गुरुसेवा करण्याचा ध्यास असावा.’

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

५ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला वाटते, ‘त्या माझ्या आई आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासून सांभाळले आहे.’

५ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर भावजागृती होऊन ‘सर्वस्व मिळाले’, असे वाटणे : मी साधना करू लागल्यावर काही दिवसांतच मला प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले. त्यांचे दर्शन झाल्यावर माझ्या डोळ्यांत अश्रू आले आणि माझी भावजागृती झाली. ‘आता सर्वस्व मिळाले. प.पू. गुरुदेवच सर्व काही आहेत.’

‘प.पू. गुरुमाऊलींनी मला साधनेत आणून माझ्यावर गुरुकृपा आणि आनंद यांचा वर्षाव केला’, त्याबद्दल मी  गुरुमाऊलींच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. वेदांत अरुण सोनार, जळगाव