गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभदिन आहे. नववर्षाच्या प्रारंभाच्या दिवशी पुढील वर्षभर करावयाच्या कृतींचा संकल्प करतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल

गुढीपाडवा

१. मातृभाषेत व्यवहार करणे

संस्कृत सर्वांत सात्त्विक भाषा आहे. त्या खालोखाल मराठी आणि हिंदी भाषा सात्त्विक आहेत; मात्र मराठी बोलतांनाही इंग्रजी शब्दांचा पुष्कळ उपयोग केला जातो. म्हणूनच मराठीचा अभिमान बाळगून शुद्ध मराठीतच व्यवहार करण्याचा निश्चय करूया.

२. भ्रमणभाषवर अधिक वेळ व्यर्थ घालवणे टाळणे

श्री. यज्ञेश सावंत

भारतात भ्रमणभाष (स्मार्ट फोन) वापरणारी तरुण पिढी आणि अन्य यांचा भ्रमणभाष हाताळण्यात दिवसभरात सरासरी ५ घंट्यांहून अधिक वेळ वाया जात आहे. एवढा वेळ भ्रमणभाष हाताळून, त्यावर सामाजिक माध्यमे, यू ट्यूबचे अनावश्यक व्हिडिओ पाहून येणारी मानसिक अस्वस्थता, होणारी चीडचीड यांमुळे दिवसभरातही काम अथवा दिनक्रम यांवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन भ्रमणभाषचा अनावश्यक वापर टाळण्याचा निश्चिय करूया.

३. योगासने/व्यायाम करणे

योगासने आणि व्यायाम यांचे शिक्षण देणार्‍या, करवून घेणार्‍या अनेक संस्था आपल्या भागात कार्यरत असतात. तेथे जाऊन समुहात योगासने आणि व्यायाम केल्यास त्याची सवय लागते अन् मनावर नियमितपणाचा संस्कारही होतो. निरोगी रहाणे, युवकांनी अभ्यास चांगला करणे आणि राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित कार्यक्रमांत सहभागी होणे यांसाठी सुदृढ शरीरसंपदा कमावली पाहिजे.

४. शूरता-वीरता जोपासणारे उपक्रम

आपण भाग्यवान आहोत की, आपण अशा महाराष्ट्रात रहातो, जेथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेकडो गड-दुर्ग आहेत. या गड-दुर्गांवर जाऊन, तेथे गिर्यारोहण करण्यासमवेत तेथील इतिहासाचे आकलन करून घेऊ शकतो. त्यामुळे छत्रपतींच्या गुणांची प्रत्यक्षात ओळख होईल.

५. अग्नीशमन आणि आपत्कालीन प्रशिक्षण

अग्नीशमन आणि आपत्कालीन प्रशिक्षण शासनाकडून दिले जाते, तसेच काही संस्थांकडूनही दिले जाते. यातील काही तंत्रे शिकल्यास त्याचा घरी अथवा आसपास आग लागल्यास ती रोखण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. ‘फायर एक्स्टिंग्युश्यर’ काहींच्या घरी, कार्यालये, महाविद्यालये, शाळा इत्यादी ठिकाणी सहज उपलब्ध असते; मात्र त्याचा उपयोग कसा करावा ? हे पुष्कळ अल्प जणांना माहिती असते.

६. प्रथमोपचारांची माहिती घेणे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना विश्रांती घेण्यासही उसंत नाही. सध्याचे रहाणीमान,  आहार-विहार, बाहेरचे खाणे इत्यादींमुळे अगदी लहान वयात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार यांनी तरूण पिढीला ग्रासले आहे. व्यायामशाळेत व्यायाम करतांना, खेळतांना, शिकतांना, प्रवासात चक्कर येणे, हृदयविकाराचा झटका येणे असे प्रकार होऊन काहींचा जीवही गेला आहे. व्यक्तीला अशा प्रकारे शारीरिक अस्वस्थता जाणवत असतांना आसपास अनेक जण असूनही ते हतबल राहून काही करू शकले नाहीत, असे त्यासंबंधित व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते. येथे प्रथमोपचाराची काही तंत्रे माहिती असली, तर संबंधितांना साहाय्य करता येते. यासाठी युवकांनी प्रथमोपचार शिकून घ्यावे.

७. आध्यात्मिक/धार्मिक संस्थेमध्ये सहभाग

शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक इत्यादी सर्व बळांमध्ये आध्यात्मिक बळ हे अधिक शक्तीशाली असते. आध्यात्मिक बळाच्या आधारावर आपण अनेक विधायक कार्ये चांगल्याप्रकारे पूर्णत्वास नेऊ शकतो. भारतीय संस्कृतीचा मुख्य उद्देशच ‘व्यक्तीतील गुणांचा विकास आणि दोष-अहंचे निर्मूलन करून त्याला ईश्वरस्वरूप करणे’ असा आहे. त्यामुळे व्यक्तीची सर्वांगिणदृष्ट्या उत्तरोत्तर प्रगतीच होत असते. हाच खरा व्यक्तीमत्त्व विकास असतो. आध्यात्मिक बळाने युक्त व्यक्ती केवळ स्वत:साठीच नाही, तर त्याचे कुटुंब, त्याच्या कार्याचे ठिकाण, समाज अशा सर्वच ठिकाणी पुढाकार घेऊन अनेकांना योग्य दिशा देऊ शकते. अशी व्यक्ती समाज आणि राष्ट्र यांनाही दिशा देण्यास सक्षम होते. आध्यात्मिक भागाचा विचार गुरुकुल व्यवस्थेमध्येच होता; मात्र ती नंतर नष्ट केल्यामुळे आता आध्यात्मिक भागाचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्या भागात कार्यरत आध्यात्मिक संस्थामध्ये सहभागी होऊ शकतात. हिंदु जनजागृती समितीद्वारे अनेक धर्मशिक्षणवर्ग प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा स्वरूपात चालू आहेत. त्यामध्ये सहभागी होऊ शकतात.

८. सार्वजनिक मंडळांच्या कार्यात सहभाग

आपल्या भागात सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळे कार्यरत असतात. त्यांना उत्सवांसाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असतेच. तेथील व्यवस्था समजून घेतल्यास सण-उत्सवांचा आपल्याला लाभ घेता येतो, तेथे सेवा देऊन अनेक गुण-कौशल्य आत्मसात करण्यासाठी लाभ होतो, तसेच मंडळाद्वारे संघटनाचेही कार्य होते. केवळ फेसबूक, व्हॉट्सॲप सारख्या सामाजिक माध्यमांवर गट बनवून त्यात निवळ माहितीची देवाणघेवाण करण्यापेक्षा प्रत्यक्ष शक्य तिकडे एकत्र येणे केव्हाही चांगले.

९. छंद जोपासणे

गायन, वादन, चित्रकला, हस्तकाम इत्यादी छंद जोपासू शकतात. काहींना अन्यही काही छंद असतात. छंद जोपासल्याने आपण करत असलेले काम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा परीक्षांचा कालावधी अशा वेळी ताण दूर करण्यासाठी, मन रमवण्यासाठी उपयोग करू शकतो. मन उत्साही करण्यासाठीही छंदाचा उपयोग होतो. पोहणे शिकून घेतल्यास त्याचा छंद म्हणून आणि आपत्कालीन पुराच्या परिस्थितीत लाभ होतो.

१०. सरकारी आवाहनांवर लक्ष ठेवणे

आपत्तींच्या वेळी सरकारकडून रक्तदान, प्रत्यक्ष मनुष्यबळाचे साहाय्य या स्वरूपाचे आवाहन केले जाते. अशा आवाहनांकडे लक्ष देऊन ज्यांना शक्य आहे, त्यांनी सहभागी झाल्यास वेगळा अनुभव मिळतो आणि समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधानही मिळते.

ही सूची पुष्कळच मोठी आहे. हिंदूंनी ठरवले, तर ते शुभसंकल्पाच्या निमित्ताने अनेक अंगांनी घडू शकतात. यातील काही कृतीही केल्या, तरी त्यांना एक दिशा मिळेल आणि आयुष्यातील अमूल्य वेळ शिक्षण, नोकरी, कामधंदा यांव्यतिरिक्त अशा गोष्टी शिकण्यात वापरल्यामुळे त्यांना समाधानही मिळेल.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१.४.२०२४)