पंडित नेहरूंच्या कालकुटाचा पंचनामा !

पाकचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या भारतभेटीच्या आधी ४ एप्रिल १९५० या दिवशी वीर सावरकर यांना अटक करण्यात आली. त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान पूर्व पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या लाखो घुसखोरांविषयी आणि तेथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी चर्चा करण्यासाठी देहलीत आले. या निमित्ताने सामाजिक शांततेत बिघाड उत्पन्न होऊ नये, या हेतूने हिंदूंची बाजू घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभूतींसह हिंदु महासभेच्या अनेक नेत्यांना प्रतिबंधक स्थानबद्धतेसाठी अटक करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ४ एप्रिल १९५० या दिवशी अटक करून त्यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ‘एक वर्ष राजकारणात भाग घ्यायचा नाही’, अशी अट घालून नेहरूंनी सावरकरांना सोडले. भारतीय प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर पहिली मोठी अटक सावरकर यांच्यासारख्या शतकातून एखाद्याच निर्माण होणार्‍या अतुलनीय स्वातंत्र्यविराला झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या अटकेला आज ७५ वर्षे होत आहेत; पण अजूनही घुसखोरांविषयीचा प्रश्न सुटलेला नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

१. नेहरूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्याचा आदेश देऊन ‘देशभक्तांचे हाडवैरी’ असल्याचे दर्शवणे

ब्रिटीश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी अत्यंत क्रौर्याने वागले. त्यांचा अतोनात छळ केला. त्यांना अपमानित केले. त्यांच्यावर अन्याय केला. ब्रिटीश स्वकीय नव्हते, ते आपले शत्रूच होते; पण नेहरू तर स्वकीय होते, तरीही ते सावरकर यांना ब्रिटिशांपेक्षा भयंकर शत्रू मानत होते. नेहरूंच्या मनात ब्रिटिशांविषयी वैरभावना नव्हती; पण त्यांच्या मनात सावरकरांविषयी पराकोटीचा वैरभाव होता. ४ एप्रिल १९५० या दिवशी नेहरूंनी सावरकर यांना अटक करण्याचा आदेश देऊन त्यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहात ठेवले. नेहरूंच्या या कृतीने ते स्वतः ‘देशभक्तांचे हाडवैरी’ आहेत आणि देशभक्तांविषयी त्यांच्या मनात विद्वेषाची भावना आहे, हे त्यांनी सिद्ध केले. देशभक्तांशी क्रौर्याने वागणार्‍या अंतर्गत विरोधकांच्या कालकुटाचा पंचनामा करून त्यांचा सभ्यतेचा, पांडित्याचा बुरखा फाडणे नितांत आवश्यक आहे.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अखंड हिंदुस्थानचा आग्रह हाच नेहरूंच्या द्वेषाला कारणीभूत !

देशाचे विभाजन करणार्‍या नेहरूंना अखंड हिंदुस्थानविषयी कोणत्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. ‘मायभूमीचे लचके तोडणे, हे महापातक आहे’, याची पुसटशी जाणीवसुद्धा नेहरूंच्या अंतःकरणाला स्पर्श करू शकली नाही. म्हणूनच अखंड हिंदुस्थानचा आग्रह धरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर नेहरूंच्या द्वेषाला कारणीभूत ठरले. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी शत्रू राष्ट्राला जन्माला घालणार्‍या नेहरूंच्या गळ्यात मात्र स्वतंत्र हिंदुस्थानच्या पहिल्या पंतप्रधानपदाची माळ घालण्यात आली.

कुमार वयात भारतमातेला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा घेणार्‍या, राष्ट्राच्या हिताचा सातत्याने विचार करणार्‍या, देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाचा मार्ग स्पष्टपणे दाखवणार्‍या वीर सावरकर यांना खुनी ठरवण्यासाठी नेहरूंनी आपल्या पांडित्याचा उपयोग केला.

३. नेहरूंनी सत्तेचा केलेला दुरुपयोग

पाकिस्तानचे त्या वेळचे पंतप्रधान लियाकत अली देहलीला येणार; म्हणून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करणारे पंडित बखले, हिंदु सभेचे कार्यकर्ते गोकुळचंद्र गोईल, वीर सावरकर यांचे अधिवक्ते शिवराव पंथ देवधर, अखिल भारतीय हिंदु महासभेचे अध्यक्ष डॉ. ना.भा. खरे, अशा सर्व नेत्यांना कारागृहात टाकण्यासाठी नेहरूंनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला. या सर्वांना कारागृहात टाकण्यामागचे कारण सांगतांना ‘नेहरूंना ठार मार मारण्याचा कट हिंदुत्वनिष्ठांनी केला. तो विफल करण्यासाठी हे अटक सत्र करण्यात आले’, असे अधिकृतपणे नेहरूंच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार करणार्‍या सरकारने सांगितले. वीर सावरकर, बोपटकर, केतकर, देवधर यांची करण्यात आलेली अटक दुष्टपणाच्या आणि सूडाच्या भावनेतून करण्यात आली होती, हे स्पष्टपणे दिसत होते.

४. सावरकर यांनी त्यांच्या अटकेच्या विरोधात मुंबई शासनाला पाठवलेले निवेदन

सावरकर यांना अटक करण्यामागचे कारण सांगतांना तत्कालीन पोलीस आयुक्त म्हणाले, ‘सावरकर यांनी बृहन्मुंबईतील मुसलमानांविरुद्ध हिंदूंना भडकवले. हिंदूंना भडकवण्याचे काम ते तसेच पुढे चालू ठेवणार आहेत. त्याच्या विरुद्ध काही निवेदन द्यायचे असेल, तर सावरकर यांनी जेलरद्वारे मुंबई शासनाकडे पाठवावे.’ सावरकर यांच्यावर हा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी २६ एप्रिल १९५० या दिवशी टंकलेखन केलेल्या ७ पृष्ठांचे २५०० शब्दांचे निवेदन इंग्रजीत पाठवले. या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे –

अ. शासनाने कोणतेही पुरावे न देता आरोप केला.

आ. प्रत्येक नागरीकाला भारतीय दंड विधानाने दिलेल्या स्वसंरक्षणाच्या मर्यादेचे अतिक्रमण करून ‘एखाद्या मुसलमानाला व्यक्तीशः किंवा समूहश: अत्याचाराने मुंबई अथवा मुंबईच्या बाहेर कुठेही मारावे’, अशी चिथावणी हिंदूंना दिली नाही. चिथावणी कधी दिली ?, ते शासकीय आरोपपत्रात सांगितलेले नाही. हा काळ डिसेंबर १९४९ ते एप्रिल १९५० असा धरला, तर या कालावधीत कुठेही मोठे दंगे झाले नाहीत.

इ. पाकिस्तानचा प्रश्न हा आता आंतरराष्ट्रीय आहे. केवळ घोषणांनी तो सुटणार नाही, तर तो शासकीय पातळीवर सोडला पाहिजे. यादृष्टीने याची सर्व कार्यवाही शासनावर सोपवली पाहिजे. माझे निश्चित मत आहे की, ‘जशास तसे’ वागून हा प्रश्न शासनाने सोडवणे आवश्यक आहे. शासन त्या दृष्टीने पावले उचलेल, अशी आशा आहे. म्हणून तो प्रश्न झुंडशाहीने सोडवण्याचा प्रयत्न करू नये. यातून अराजक निर्माण झाले, तर स्वातंत्र्याला धोका ठरेल तसे करू नये. शासन योग्य धोरणाने वागत नसेल, तर लोकशाही मार्गाने हे शासन पालटण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. यासाठी हिंदु महासभेने घटनात्मक मार्गाने अखंड हिंदुस्थान स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.

ई. जानेवारी ते एप्रिल १९५० या कालखंडात मी दोनच प्रकट पत्रके काढली. पहिले पत्रक २६ जानेवारी देश स्वतंत्र झाला त्यासंबंधी आनंद व्यक्त करणारे आणि ‘देशाच्या रक्षणासाठी तो शस्त्रसज्ज करावा’, असे आवाहन करणारे. दुसरे पत्रक राष्ट्रपतींचे त्यांच्या निवडणुकीसाठी अभिनंदन करणारे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काम माझ्यावर सोपवले जाईल, ते करण्यास मी सिद्ध आहे, तसेच काही पत्रकात ‘आपल्या स्वातंत्र्यरक्षणार्थ… हे संघराज्य भूदल, नौदल, वायुदलाने सज्ज असावे’, या विधेयकावर भर दिला आहे. या माझ्या भाषणावरून आणि लेखनावरून स्पष्ट होते की, ‘मी भारतीय गणराज्याच्या संरक्षणासाठी लोकांनी सज्ज रहावे’, असेच प्रमुखपणे म्हटले आहे. जातीजातीत लढावे, असे सांगितलेले नाही.

उ. गेल्या २ वर्षांत मी महामुंबईत एकही भाषण दिले नाही. कोणत्याही सभेला गेलो नाही. घरी कुणाला भेटलो नाही. ही माहिती गुप्तचरांच्या प्रतिवृत्तावरून सिद्ध होईल.

५. नेहरूंचा कुटील डाव

‘सावरकर जर पुनश्च राजकारणात आले, तर स्वतःची डाळ शिजणार नाही’, याची खात्री नेहरूंना होती. सत्तेत स्वतःला सत्तेचा मलिदा खाता यावा; म्हणून सावरकरांसारखा प्रखर राष्ट्रवादी आणि तेजस्वी नेता आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड येता कामा नये, यासाठीच सावरकरांना सातत्याने खुनी ठरवून त्यांच्या लोकप्रियतेला, त्यांच्या कारकीर्दीला नामशेष करण्याचा कुटील डाव नेहरूंनी टाकला. पुढील अनुच्छेद त्याची साक्ष देतो, ‘सावरकरांची या अटकेतून सुटका झाली ती १३ जुलै १९५० या दिवशी, म्हणजेच १०० दिवसांनी सुटका झाली; पण ती सरळ सुटका करण्यात आली नाही. त्यासाठी सावरकरांना अटी घालण्यात आल्या. सावरकरांचे अधिवक्ते धारप यांना न्यायालयाला आश्वासन द्यावे लागले… ‘माझे पक्षकार श्री. विनायक दामोदर सावरकर मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रहातील आणि राजकारणात कोणताही भाग घेणार नाहीत.’ असे वचन घेऊन नंतर सावरकर यांची सुटका करण्याचा आदेश देण्यात आला.

(संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सांगता पर्व १९४७-१९६६’, पृष्ठ ९६ ते १०४)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली (२.४.२०२५)