छत्रपती संभाजीराजांनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याचे उत्तर ऐकताच औरंगजेबचा संताप झाला. त्याने संभाजीराजांना ठार मारण्याचे ठरवले. तो संभाजीराजांना, म्हणजेच शत्रूला एकदम ठार मारणार नव्हता, तर त्यांचे हाल हाल करून मारणार होता. त्याला सर्वांवर दहशत बसवायची होती.
प्रथम औरंगजेबाने लोखंडाची सळई लालभडक होईपर्यंत तापवली आणि ती त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये खुपसण्यात आली. ती सळई डोळ्यांमध्ये फिरवून दोघांचे डोळे बाहेर काढले, तरीही संभाजीराजे आणि कवी कलश डगमगले नाहीत. या अंध अवस्थेत थोडे दिवस ठेवण्यात आले. मग दुसर्या शिक्षेला आरंभ झाला. औरंगजेबाने मग दोघांच्याही जिभा कापण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे जिभा कापण्यात आल्या. अजूनही औरंगजेबाचे समाधान होत नव्हते. यानंतर वाघनखे फिरवून कातडी सोलून काढण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे दोघांचीही कातडी सोलण्यात आली. दोघेही यातना सहन करत होते.
बादशाहने अगोदर कवी कलश याला ठार मारण्याचे ठरवले. सैनिकांच्या हस्ते धारदार कुर्हाडीने त्याचे हात-पाय तोडण्यात आले. नंतर शरिराचे तुकडे करून नदीपात्रात फेकण्यात आले. आता बादशाहने छत्रपती संभाजी महाराजांना ठार करण्याचे ठरवले. तो अमावास्येचा दिवस होता (११.३.१६८९) !
संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत संभाजीराजांना आणून एका खांबाला बांधण्यात आले. सैनिकांनी हातातील धारदार कुर्हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला. एका घावातच संभाजीराजांचे शीर धडापासून वेगळे होऊन भूमीवर कोसळले. मानेतून रक्ताचा लोंढा उसळला. नंतर त्यांनी धारदार कुर्हाडीने मग संभाजीराजाच्या शरिरावर धडाधड घाव घालून ते तुकडे नदीत फेकून देण्यात आले.
(साभार : मासिक ‘धनुर्धारी’, मार्च २०१७)