‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडून पार्किंगची वसुली !

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पैसे उकळण्याचा प्रकार !

नवी मुंबई, ५ एप्रिल (वार्ता.) – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) परिसरात ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पार्किंगच्या ठेकेदाराकडून वसुली केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयापासून ते मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही याची माहिती आहे. (यावर कुणीच नियंत्रण कसे आणत नाही ? – संपादक)


१. तुर्भे येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ५ बाजारपेठांचा समावेश आहे. समितीच्या पाचही बाजारपेठांच्या सभोवतालचे काही रस्ते नवी मुंबई महानगरपालिकेने ‘पे अँड पार्क’साठी ठेकेदाराला दिलेले आहेत.

२. एका रस्त्यावर फळ विक्रेत्यांच्या गाड्या असतात. तेथेही अशा स्वरूपाची वसुली केली जाते.

३. त्याचप्रमाणे ए.पी.एम्.सी. परिसरातील अन्य काही ठिकाणी देखील सदर संबंधित ठेकेदाराला पार्किंगचे शुल्क वसुली करण्याची अनुमती नसतांना तेथेही बेकायदेशीरपणे वसुली केली जाते. पैसे न दिल्यास काही मुले रात्रीच्या वेळी गाड्यांच्या टायरची हवा सोडून देतात. परिसरातील पंक्चर काढणार्‍यांना या गाड्यांमध्ये हवा भरण्यासाठी जाऊ नये, अशी धमकी दिली जाते. या ठिकाणी बळजोरीने वाहनचालकांकडून २०० ते २५० रुपये पार्किंग शुल्क उकळले जाते. (असा उद्दामपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा हवी ! – संपादक)