पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचे अनेक पुरावे सापडले !

भारतीय पुरातत्व विभागाकडील देवस्थानांच्या कागदपत्रांवरून स्पष्ट !

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड

जुन्नर तालुक्याचे नाव ‘शिवनेर’ करण्याची जनतेची मागणी !

जुन्नर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड हा जुन्नर शहरालगतच असून यापूर्वी जुन्नर तालुक्याचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचे पुरावे सापडले आहेत. छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात पालट करून ‘शिवनेरी’ तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. सामाजिक माध्यमांवरही ही मागणी करण्यात आली आहे.

१. जीर्ण वास्तूंचे शहर म्हणून तालुक्याला जुन्नर हे नाव पडले असावे; मात्र या नावात तितकेसे तथ्य वाटत नसल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. वर्ष १८६१ पूर्वी जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेर तालुका असल्याचे भारतीय पुरातत्व विभागातून काढलेल्या देवस्थानांच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

२. सर जॉर्ज रसल, गव्हर्नर ऑफ बाँबे यांनी २२ नोव्हेंबर १८६१ या दिवशी ओतूर येथील देवस्थानांच्या देखभाल, पूजाअर्चा करणार्‍या त्या-त्या समाजाला देवस्थानांच्या कायमस्वरूपी सनदा प्रदान केल्या आहेत. त्यात मार्तंड देवस्थान परीट समाजाकडे, लक्ष्मी नारायण मंदिर बैरागी यांच्याकडे, पांडुरंग मंदिर ब्राह्मण समाजाकडे, श्री कपर्दिकेश्वर महादेव मंदिर गुरव समाजाकडे आहे, असे त्या सनदेत म्हटले आहे. या सर्व देवस्थानांसाठी मिळून एक ठराविक सनद देण्यात आली. त्या सनदेत जुन्नरचे पूर्वीचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

३. २२ सप्टेंबर १८५४ या वर्षी देवस्थान इनाम वर्ग ३ भूमीची गुरव समाजातील पूर्वज साळू बालाजी गुरव यांनी सिद्ध केलेल्या कैफियतमध्येही जुन्नरचे नाव शिवनेर तालुकाच आहे, असे लक्षात आले आहे.

४. गुरव समाजाकडे असलेल्या ‘लँड एलिकेशन प्रत’वरही जुन्नरचे नाव पूर्वी शिवनेर तालुका असल्याचे नमूद आहे.